बेशिस्त २२० वाहनधारकांवर कारवाई
By Admin | Updated: December 8, 2015 00:02 IST2015-12-07T23:58:01+5:302015-12-08T00:02:09+5:30
पोलीस आयुक्तालय : वाहन तपासणी मोहिमेस सुरुवात

बेशिस्त २२० वाहनधारकांवर कारवाई
नाशिक : शहरात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्याही वाढली आहे़ वाहनधारकांकडून वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अपघातांची संख्या वाढली असून, मृत्युमुखी, तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे़ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस ठाणे व वाहतूक शाखेमार्फत बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध सोमवारपासून कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे़ या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी २२० वाहनधारकांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे़ यामध्ये सिग्नल तोडणे, मालवाहू वाहनाच्या फाळक्यावरून मालाची वाहतूक करणे, रेती, दगड, वाळू रस्त्यावर सांडेल अशी वाहतूक करणे, सीट बेल्ट न लावणे, फॅन्सी नंबर प्लेट, नियमापेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणे, धोकादायक स्थितीत रस्त्यावर वाहन उभे करणे, राँग साईड वाहन चालविणे, फुटपाथवर वाहन उभे करणे, प्रवेश बंद मार्गाने वाहन चालविणे, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे़ बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करण्याची ही मोहीम सुरूच राहणार असून, यामध्ये शहर वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्तप्रशांत वाघुंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागवान, कांबळे, पोलीस निरीक्षक गाडे, डाबेराव, सहायक पोलीस निरीक्षक कदम, सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक पालकर यांच्यासह स्थानिक पोलीस ठाण्याचे व शहर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)