आरंभ महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: July 28, 2016 01:06 IST2016-07-28T00:51:52+5:302016-07-28T01:06:33+5:30
आरंभ महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी

आरंभ महाविद्यालयात दोन गटांत हाणामारी
नाशिकरोड : जिजामातानगर येथील आरंभ महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याने दोन विद्यार्थी जखमी झाले आहेत. पोलिसांनी संबंधित विद्यार्थ्यांना शोधून त्यांना महाविद्यालयातच खाकीचा झटका दाखविला.
आरंभ महाविद्यालयात मंगळवारी सकाळी मधल्या सुटीत दोन विद्यार्थ्यांमध्ये धक्का लागल्यावरून वादविवाद झाला होता. त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी के. जे. मेहता व बिटको महाविद्यालयातील आपल्या विद्यार्थी मित्रांना फोन करून बोलवून घेतले होते. मारुती झेन गाडीत व दुचाकीवर आलेले विद्यार्थ्यांचे दोन्ही गट आरंभ महाविद्यालयासमोर एकमेकांना भिडल्याने तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांचा, काठ्यांचा वापर करत विटा फेकून मारण्यात आल्या. यामध्ये विद्यार्थी सागर शंकर चिखले याच्या हाताच्या पंजावर व राहुल अजय उज्जैनवाला याच्या डोक्यास मार लागून दुखापत झाली. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टवाळखोर युवकांची गर्दी झाल्याने परिसरातील रहिवासी व दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मारामारी करणाऱ्या टवाळखोर युवक आणि विद्यार्थ्यांना शोधून काढले. (प्रतिनिधी)