रस्त्यांवरील विक्रेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: April 4, 2017 01:50 IST2017-04-04T01:50:42+5:302017-04-04T01:50:56+5:30
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.३) गंगापूररोड तसेच रविवार कारंजा परिसरात रस्त्यांवर दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडील साहित्य जप्त केले

रस्त्यांवरील विक्रेत्यांवर कारवाई
नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी (दि.३) गंगापूररोड तसेच रविवार कारंजा परिसरात रस्त्यांवर दुकाने थाटणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करत त्यांच्याकडील साहित्य जप्त केले. मनपाच्या या मोहिमेमुळे विक्रेत्यांची स्वत:चे साहित्य वाचविण्यासाठी एकच धावपळ उडाली.
महापालिकेच्या वतीने दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा रस्त्यांवर ठाण मांडून बसत वाहतुकीला अडथळा ठरलेल्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला. तीन महिन्यांपूर्वीच महापालिकेने रविवार कारंजा परिसरात मोहीम राबविली होती, परंतु अतिक्रमण विभागाच्या पथकाची पाठ फिरल्यानंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ बनली. महापालिकेच्या पथकाने सोमवारी नाशिक पश्चिम विभागातील जेहान सर्कल ते आनंदवल्ली कॅनॉल रोड याठिकाणी दुतर्फा रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली. त्यानंतर पथकाने गजबजलेल्या रविवार कारंजा भागात आपला मोर्चा वळविला. याठिकाणीही पथकाने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करत त्यांच्याकडून साहित्य जप्त केले. त्यात तीन टपाच्या हातगाड्या, १६ स्टूल, सात बादल्या, एक गॅस सिलिंडर, तीन कॅरेट, पाच बोर्ड, दोन गॅस शेगड्या, पाच टेबल, पाच खुर्च्या, एक गिझर, एक लोखंडी जाळी, दोन छत्र्या, स्वयंपाकाची भांडी आदि साहित्य जप्त करण्यात आले. सदर मोहीम कारवाई राबविताना विभागीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता. (प्रतिनिधी)