डेंग्यू रोखण्यासाठी कृती आराखडा

By Admin | Updated: July 10, 2015 00:08 IST2015-07-10T00:08:02+5:302015-07-10T00:08:15+5:30

आरोग्य-वैद्यकीय विभागाची बैठक : दक्षता पथक स्थापनेचे महापौरांचे आदेश

Action plan to prevent dengue | डेंग्यू रोखण्यासाठी कृती आराखडा

डेंग्यू रोखण्यासाठी कृती आराखडा

नाशिक : शहरात डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केल्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाची बैठक बोलावत डेंग्यू रोखण्यासाठी तीन दिवसांत कृती आराखडा सादर करण्याचे आदेश दिले. याशिवाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबरोबरच लोकप्रबोधन करण्याच्याही सूचना महापौरांनी दिल्या.
शहरात आठवडाभरात डेंग्यूचे सात संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याने महापालिकेची यंत्रणा सतर्क करण्यासाठी महापौर अशोक मुर्तडक यांनी आरोग्य व वैद्यकीय विभागातील अधिकारी, स्वच्छता निरीक्षक यांची तातडीची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात बोलाविली होती. बैठकीला उपमहापौर गुरुमित बग्गा, स्थायी समितीचे सभापती शिवाजी चुंभळे, अतिरिक्त आयुक्त जीवनकुमार सोनवणे, नगरसेवक प्रा. कुणाल वाघ, यशवंत निकुळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड, आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे, डॉ. सुनील बुकाणे आदि उपस्थित होते.
यावेळी डॉ. गायकवाड यांनी शहरात जानेवारी ते जुलै या दरम्यान मलेरियाचे २३, तर डेंग्यूचे १७ रुग्ण दाखल होऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती दिली. त्यानंतर महापौर अशोक मुर्तडक यांनी सांगितले की, डेंग्यूचा फैलाव होण्यापूर्वीच उपाययोजना होणे अत्यंत गरजेचे आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत, याबाबतचा कृती आराखडा तयार करून तो तीन दिवसांत सादर करावा. याशिवाय दर आठवड्याला अहवाल सादर करावा. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधत डेंग्यूला रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. दक्षता पथक स्थापन करावे आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याबरोबरच स्टीकर्स, पत्रके या माध्यमातून जनजागृती करण्याचीही सूचना महापौरांनी केली.
उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी सांगितले की, सिंहस्थाचे मोठे आव्हान समोर असताना त्यात डेंग्यूसारख्या आजारांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. आरोग्य व वैद्यकीय विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक भागात जाऊन लोकांचे प्रबोधन करावे.
टायर्स, मनीप्लॅँट, पाण्याच्या टाक्या याबाबत स्वच्छता ठेवण्याचे आवाहन करण्याचीही सूचना बग्गा यांनी केली. शिवाजी चुंभळे यांनी पत्रके वाटण्यापेक्षा माहितीपर स्टीकर्स दरवाजांवर चिकटविल्यास ते कायमस्वरूपी नागरिकांच्या समोर राहील, अशी सूचना केली. प्रा. कुणाल वाघ यांनी रक्तनमुने तपासणीसाठी महापालिकेकडे यंत्रणाच उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यावेळी स्वच्छता निरीक्षकांनीही येणाऱ्या अडचणी मांडल्या. (प्रतिनिधी)

Web Title: Action plan to prevent dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.