तक्रारी प्रलंबित राहिल्यास विभागप्रमुखांवर कारवाई
By Admin | Updated: April 7, 2016 00:05 IST2016-04-07T00:02:01+5:302016-04-07T00:05:11+5:30
महापालिका : आयुक्तांनी मागविला अहवाल

तक्रारी प्रलंबित राहिल्यास विभागप्रमुखांवर कारवाई
नाशिक : महापालिकेने गतवर्षी १५ सप्टेंबरला स्मार्ट सिटीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या तक्रारी व सूचनांसाठी वाजत-गाजत ‘स्मार्ट नाशिक’ हे मोबाइल अॅप आणले; परंतु ३० दिवसांचा कालावधी उलटूनही तक्रारींचा निपटारा होत नसल्याने आयुक्तांनी विभागप्रमुखांनाच जबाबदार धरले असून, मुदतीत कार्यवाही न झाल्यास कारवाईचा इशारा दिला आहे.
मनपाचा स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष असून हेल्पलाइनसह मोबाइल अॅपवरही तक्रारींचा पाऊस पडत असतो. मात्र, तक्रारींचे निराकरण मुदतीत होत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने आयुक्तांनी त्याची गंभीर दखल घेतली. सर्व विभागप्रमुखांकडून त्यासंबंधीचा अहवाल मागविला आहे. महापालिकेकडे एखाद्या नागरिकाने तक्रार केल्यास तीस दिवसांच्या आत तक्रारीचे निराकरण होणे आवश्यक आहे. परंतु ३० दिवस उलटूनही तक्रारी प्रलंबित राहण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रलंबित तक्रारींचा निपटरा करण्याचे आणि ३० दिवसांच्या आत तक्रारी निकाली काढण्याचे आदेश आयुक्तांनी विभागप्रमुखांना काढले आहेत. विभागप्रमुखांनी तक्रारींसंबंधी केलेल्या कार्यवाहीचा अहवालही सादर करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या आहेत.