राष्ट्रवादी, भाजपला मोकळे सोडून सेनेवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:15 IST2021-07-28T04:15:10+5:302021-07-28T04:15:10+5:30
सध्या शिवसेनेतर्फे शिवसंपर्क मेळाव्याचे आयोजन ठिकठिकाणी केले जात आहे. मात्र पोलिसांकडून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सपाटा लावल्याने शिवसैनिक संतप्त ...

राष्ट्रवादी, भाजपला मोकळे सोडून सेनेवर कारवाई
सध्या शिवसेनेतर्फे शिवसंपर्क मेळाव्याचे आयोजन ठिकठिकाणी केले जात आहे. मात्र पोलिसांकडून आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा सपाटा लावल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान सुरू असून, त्यात महाविकास आघाडी सरकारने केलेले काम व जनहिताच्या निर्णयांची माहिती देण्याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी या अभियानाच्या निमित्ताने केली जात आहे. नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यात सध्या हे अभियान सुरू असताना आडगाव परिसरातील एका लॉन्समध्ये शिवसैनिकांनी मेळाव्याचे आयोजन केले असता, आडगाव पोलिसांनी जमावबंदी आदेशाचा भंग केला म्हणून आयोजक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्ह्यात अशाच प्रकारचे मेळावे होत असताना आणि त्यांच्यावर पोलीस कारवाई झालेली नसताना पोलिसांनी फक्त शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केल्याने शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादीचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाशिक दौऱ्यात मंदिरात पूजा करताना राष्ट्रवादीने गर्दी केली तर भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप युवा मोर्चाचा मेळावा पक्ष कार्यालयात घेण्यात आलेला असताना या दोन्ही गोष्टींकडे पोलिसांनी कानाडोळा केला. दोन्ही ठिकाणी गर्दी झालेली असताना फक्त राष्ट्रवादीच्या पाच पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली व मंत्र्यांना मात्र नामानिराळे सोडले तर भाजपच्या मेळाव्यावर कोणतीही कारवाई केली नाही. सिडको व इंदिरानगरच्या शिवसेनेच्या शिवसंपर्क मेळाव्यावरही गुन्हे दाखल करण्यात आल्याने शिवसेनेने नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेवर एकतर्फी कारवाई होत असल्याबद्दल लवकरच नेतृत्वाकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.