कृती समितीचे ठाकरे यांना साकडे
By Admin | Updated: June 12, 2014 01:22 IST2014-06-12T01:18:47+5:302014-06-12T01:22:13+5:30
कृती समितीचे ठाकरे यांना साकडे

कृती समितीचे ठाकरे यांना साकडे
नाशिक : ‘यूपीएससी’ने नागरी सेवांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षांसाठी वयोमर्यादेत वाढ केल्याच्या पार्श्वभूमीवर ‘एमपीएससी’नेही वयोमर्यादा वाढवून द्यावी, यासाठी विद्यार्थी कृती समितीने आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना साकडे घातले आहे.
दरम्यान, सदरप्रश्नी कृती समितीने याआधी जिल्हाधिकारी, आमदार, खासदार, महसूलमंत्री, मुख्यमंत्र्यांपासून ते थेट कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनादेखील निवेदन दिले आहे. मात्र, दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सर्वांकडूनच निकालानंतर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कृती समितीला देण्यात आले होते. लोकसभा निवडणूक झाली, निकाल लागला; मात्र या प्रश्नावर कुणीही बोलायला तयार नाही. आता सर्वांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. यातच नाशिक दौऱ्यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत कृती समितीने याप्रश्नी ठाकरे यांना लक्ष घालण्याची गळ घातली आहे. ठाकरे यांनीही यावर तोडगा काढण्याचे आश्वासन कृती समितीला दिले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) यंदा सर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने याच बदलाची री ओढत महाराष्ट्र लोकसेवा आयोगानेही (एमपीएससी) विहित वयोमर्यादेत वाढ करावी, अशी मागणी ‘एमपीएससी’चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून पुढे आली. यासाठी नाशिक शहरात प्रथम विद्यार्थी कृती समिती स्थापन करण्यात आली. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्हाभरातून विद्यार्थ्यांनी समितीशी संपर्क साधत सदर मागणीेला पाठिंबा दर्शविला. यानंतर कृती समितीने स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींना निवेदन देत सदर प्रश्नी लक्ष घालण्याची मागणी केली होती. त्यावेळी लोकसभा निवडणुकीनंतर यावर तोडगा काढण्याचे आश्वासन मिळाल्यामुळे कृती समिती आजवर गप्प होती; मात्र निवडणूक निकालानंतरही यावर कोणीच काहीही बोलायला तयार नसल्यामुळे समितीने नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांची मंगळवारी शासकीय विश्रामगृहावर भेट घेत याप्रश्नी लक्ष घालण्याची गळ घातली. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष एस. जी. गायकवाड, प्रमोद मटाले, सागर हांगे उपस्थित होते. (प्रतिनिधी)