कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित
By Admin | Updated: July 15, 2015 01:46 IST2015-07-15T01:45:25+5:302015-07-15T01:46:20+5:30
कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित

कुंभमेळ्यासाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा हे शतकानुशतके चालणारे पर्व असल्यामुळे या पर्वासाठी भविष्यात कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्याच्या दृष्टीने कुंभमेळ्यातील साधुग्रामसाठी जागा अधिग्रहित करून, त्यासाठी जागा मालकांना योग्य मोबदलाही अदा करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंगळवारपासून सुरू झालेल्या सिंहस्थ कुंभपर्वाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर ते बोलत होते. गोदाघाटावर सकाळी मंगलमय व धार्मिक वातावरणात झालेल्या या सोहळ्यास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे व तीनही आखाड्यांचे श्रीमहंत उपस्थित होते. नाशिकचा कुंभमेळा हरिद्वार, प्रयाग, उज्जैनपेक्षाही वेगळा असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस यांनी, नाशिक वगळता अन्यत्र ठिकाणी चार हजार एकर जागा कुंभमेळ्यासाठी उपलब्ध असते, नाशिकला मात्र सव्वातीनशे एकरच जमीन उपलब्ध होऊ शकते शिवाय हा कुंभमेळा पावसाळ्यातच येत असल्यामुळे मोठे आव्हान असते. तरीही शासनाने साधुग्रामसाठी जागा अधिग्रहित करण्याबरोबरच साडेतीनशे मीटर लांबीचे दहा घाट बांधण्यात आल्यामुळे गोदावरीचे पावित्र्य राखण्यास मदत तर होईलच; परंतु लाखो भाविकांना स्रानासाठी त्याचा वापर करता येणार असल्याचे सांगितले. दर बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळाचे नाव सिंहस्थ महाकुंभ असे असले तरी, यावेळी पहिल्यांदाच या कुंभपर्वात हरित कुंभ संकल्पना राबवून काही तरी वेगळे करण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. हरित कुंभ म्हणजे संपूर्ण निसर्गाला समर्पित असा कुंभ साजरा करणे असे असून, हिंदू धर्माची परंपराच निसर्गाशी साधर्म्य साधणारी व निसर्गाचे संवर्धन करणारी राहिली आहे. त्यामुळे या कुंभमेळ्यात कचरा करणार नाही, कचरा टाकणार नाही, कचरा करू देणार नाही असे प्रत्येकाने ठरविले, तर खऱ्या अर्थाने हरित कुंभ साकार होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले. सिंहस्थ कुंभमेळ्यात साधू-महंतांना कोणतीही कमतरता भासू नये म्हणून प्रयत्न केले असले तरी, घरच्या समारंभात कितीही तयारी केली तरी समाधान होत नाही, असे सांगून कुंभपर्वासाठी आलेले साधू-संत करुणादायी असून, नियोजनात काही चूक झाली तर गोड मानून घेतील, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.