आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: February 16, 2017 01:00 IST2017-02-16T00:59:53+5:302017-02-16T01:00:04+5:30
मिनी मंत्रालय निवडणुकीत रंगणार राजकीय फड

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
नाशिक : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोघा खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असताना आता चार विद्यमान आमदारांची व सात माजी आमदारांची प्रत्यक्ष प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात एकाच कुटुंबात दोन उमेदवारी मिळाल्याने तर आमदार निर्मला गावित यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
इगतपुरीच्या आमदार निर्मला गावित यांच्या कन्या नयना रमेश गावित या वाडीवऱ्हे येथून तर पुत्र हर्षल रमेश गावित हे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील ठाणापाडा या गटातून उमेदवारी करीत आहेत. सुरगाणा विधानसभेचे आमदार जिवा पांडू गावित यांचे पुत्र इंद्रजित गावित तर भदर गणातून तसेच पेठ तालुक्यातील धोंडमाळ गटातून माकपच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चांदवडचे आमदार डॉ. राहुल अहेर यांचे चुलत बंधू जि. प. सभापती केदा अहेर यांच्या पत्नी धनश्री अहेर लोहणेर गटातून भाजपाच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. निफाडचे आमदार अनिल कदम यांचे चुलत बंधू यतिन कदम ओझर गटातून नागरी विकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवित आहेत. या चौघा आमदारांची या निमित्ताने थेट प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवसेनेचे माजी आमदार धनराज महाले स्वत: दिंडोरी तालुक्यतील खेडगाव गटातून निवडणूक लढवित आहेत. तसेच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचे चिरंजीव राहुल कोतवाल, माजी आमदार लहानू अहिरे यांचे चिरंजीव गणेश अहिरे हे पठावे दिगर गटातून आदिवासी क्रांती संघटनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी आमदार अॅड. माणिकराव कोकाटे यांच्या कन्या सिमंतीनी कोकाटे या देवपूर गटातून, काशीनाथ मेंगाळ यांच्या पत्नी सुशीला मेंगाळ या शिरसाटे गटातून तर माजी आमदार दिलीप बनकर यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्य मंदाकिनी बनकर या पालखेड गटातून तसेच माजी मंत्री अर्जुन पवार यांचे चिरंजीव नितीन पवार कनाशी गटातून तसेच दोन स्नुषा माजी अध्यक्ष जयश्री पवार व राष्ट्रवादी कॉँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार या अनुक्रमे खर्डेदिगर व मानूर गटातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. (प्रतिनिधी)