‘प्लॉट्स’ मिळत नसल्याचा आरोप
By Admin | Updated: October 4, 2015 23:20 IST2015-10-04T23:17:54+5:302015-10-04T23:20:13+5:30
माळेगावच्या ग्रामसभेत ठराव : एमआयडीसीबाबत उद्योगमंत्र्यांशी पत्रव्यवहार करणार

‘प्लॉट्स’ मिळत नसल्याचा आरोप
सिन्नर : एमआयडीसीकडून माळेगाव ग्रामपंचायतीच्या प्रलंबित समस्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही व स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी करूनही त्यांना प्लॉट्स मिळत नसल्याचा आरोप माळेगावच्या ग्रामसभेत करण्यात आला. याबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई व एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करण्याचा ठराव ग्रामसभेत करण्यात आला.
सरपंच अनिल आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत प्रारंभी महात्मा गांधी व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. नायब राज्यपाल राम कापसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी होण्याबाबत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांनी पाठविलेले पत्र ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी वाचून दाखविले.
यावेळी अभियानात सहभागी होण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीची स्थापना करण्यात आली. समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच तुकाराम सांगळे यांची, तर सदस्यपदी संजय जाधव, प्रकाश सांगळे, बाळू घुगे, रतन जाधव, नीलेश जाधव, सतीश सांगळे, कैलास सांगळे, दत्तात्रय सांगळे, खंडेराव सांगळे, शैला पवार, मालती आव्हाड, अशोक जाधव, पोलीसपाटील बाळासाहेब सांगळे, विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब सांगळे यांची निवड करण्यात आली.
जिल्हा स्तरावरील प्रथम पुरस्कार मिळविण्यासाठी कार्यवाही करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. पर्यावरण संतुलित ग्राम योजनेत सहभागी होणे, आयपीपीई-१चे सर्वेक्षण करणे, पाणीटंचाई आराखडा तयार करणे, समाज कल्याण विभागाच्या योजनांच्या लाभार्थींची निवड करणे, व्यापारी गाळ्यांचा लिलाव करणे, गावालगत बीओटी तत्त्वावर मार्केट विकसित करणे आदि विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी देण्यात आली. ग्रामसभेस उपसरपंच वामन गाडे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय सांगळे, खंडू सांगळे, अशोक जाधव, अमोलिक जाधव, सुशीला सांगळे, जयश्री जाधव, संगीता सांगळे, हर्षदा जाधव,
मालती आव्हाड, शैला पवार, शरद पवार आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामविकास अधिकारी गिरी यांनी उपस्थितांना
स्वच्छतेची शपथ दिली. सरपंच आव्हाड यांनी आभार मानले. (वार्ताहर)