मविप्र सेवक सोसायटीत आरोप-प्रत्यारोप

By Admin | Updated: September 11, 2016 01:53 IST2016-09-11T01:53:11+5:302016-09-11T01:53:23+5:30

वार्षिक सभा : सभासद खात्यांत फेरफार; कर्मचारी भरतीचा मुद्दा गाजला

Accusations and allegations in the MVP Sevak Society | मविप्र सेवक सोसायटीत आरोप-प्रत्यारोप

मविप्र सेवक सोसायटीत आरोप-प्रत्यारोप

नाशिक : जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज सेवक सहकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत इतिवृत्त वाचनादरम्यान विरोधी गटाच्या सभासदांनी आक्रमक पवित्रा घेत विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारात व कर्मचारी भरतीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. सत्ताधारी गटानेही विरोधकांच्या आरोपांचे संतप्त सुरात प्रत्युत्तर देत मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या भरतीप्रक्रिया आणि व्यवहारांवर बोट ठेवल्याने सभागृहात दोन्ही पक्षांकडून मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले.
रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र समाज सेवक सहकारी सोसायटीची वार्षिक सभा शनिवारी गदारोळात पार पडली. व्यासपीठावर अध्यक्ष संजय नागरे, उपाध्यक्ष लहू कोर, चिटणीस चित्तरंजन न्याहरकर, नानासाहेब दाते, बाळासाहेब मोगल, परशूराम कथले, अशोक बाजारे, भागवत गवळी, बळीराम जाधव, राजेंद्र पाटील, गुलाब भामरे, सुवर्णा कोकाटे, सुप्रिया सोनवणे आदि संचालक उपस्थित होते. मागील सभेचे इतिवृत्त वाचन सुरू असताना सभासदांनी त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आग्रह धरल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सत्ताधारी गटाच्या संचालक व सभासदांनी विरोध केल्याने काही सभासदांमध्ये हमरी-तुमरीही झाली. प्रा. शंकर राजोळे यांनी गैरव्यवहाराच्या आरोपातून निर्दोष ठरल्याचे सांगत आपल्यावरील चौकशीचा खर्च विद्यमान संचालकांनी करण्याची मागणी केली. लेखा परीक्षकांनी नेमणुकीच्या व फीचा मुद्दाही सभेतील वादाचा विषय ठरला. नवीन कर्मचारी भरतीच्या मुद्द्यावरही दोन्ही बाजूनी संतप्त प्रतिक्रि या उमटल्या. तसेच आर्थिक गैरव्यवहाराचेही आरोप झाले.
नवीन सभासदांच्या प्रकरणात काही सभासदांकडून राजकारण होत असल्याचा आरोप संचालक नानासाहेब दाते यांनी केला. संचालक मंडळाने सभासदांच्या विविध मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. मात्र सभासदांचे समाधान न झाल्याने गदारोळाच्या स्थितीतच सभेपुढील विषयांना मंजुरी देऊन सभा गुंडाळण्याचा निर्णय सभासदांनी घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Accusations and allegations in the MVP Sevak Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.