वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा योजना ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 18:35 IST2018-08-12T18:31:18+5:302018-08-12T18:35:09+5:30
वावी : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागासाठी जीवनदान ठरलेली वावीसह अकरा गाव पाणीपुरवठा गेल्या आठ दिवसांपासून तांत्रिक बिघाडामुळे ठप्प झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वावीसह योजनेत समाविष्ट असलेल्या गावांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. वावीसह परिसरात अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पाण्याचे कोणतेही स्त्रोत उपलब्ध नसल्याने पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी कोळगावमाळ येथील तलावावर विद्युत जलपंपाचे स्टार्टर नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त केल्यानंतर त्याच दिवशी विद्युत जलपंप जळाला आहे. पाणीउपसा करणारे दोन्ही विद्युत जलपंप जळाल्याने वावी येथील जलकुंभात पाणी आले नाही. तलाव पाण्याने पूर्णपणे भरलेला असतांना केवळ तांत्रिक कारणामुळे वावीसह कहांडळवाडी, दुशिंगपूर, सायाळे, मलढोण, मिठसागरे, शहा या गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले असतांना वावीसह परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सर्व कूपनलिका कोरड्या पडल्या आहे. विहिरींनीही तळ गाठला आहे. त्यामुळे पाण्याचा कोणताही स्त्रोत उपलब्ध नसल्याने योजनेतील हजारों ग्रामस्थांना टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. खासगी टॅँकरकडून पाणी विकत घेण्याची वेळ वावीसह परिसरातील ग्रामस्थांवर आली आहे.
पाणीपुरवठा समितीने ग्रामस्थांची गैरसोय विचारात घेऊन तातडीने तांत्रिक अडचणी दूर करुन पाणीपुरवठा करण्याची मागणी वावीसह योजने समाविष्ट असलेल्या ग्रामस्थांनी केली आहे.