अपमानास्पद वागणुकीविरोधात खातेप्रमुख एकवटले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:24 IST2017-07-18T00:24:29+5:302017-07-18T00:24:45+5:30
अपमानास्पद वागणुकीविरोधात खातेप्रमुख एकवटले?विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याची तयारी

अपमानास्पद वागणुकीविरोधात खातेप्रमुख एकवटले?
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांच्या विरोधात जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्य असतानाच आता पदोपदी अपमानास्पद वागणूक देत असल्याचे कारण देत सर्व खातेप्रमुख एकत्र आल्याची चर्चा आहे. येत्या एक-दोन दिवसात विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडेच थेट याबाबत सर्व खातेप्रमुख एकत्र येऊन तक्रार करणार असल्याचे समजते.
गेल्या दोन महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी आल्या आल्याच कर्मचारी व अधिकाऱ्यांवर शिस्तीचा बडगा उगारला होता. गळ्यात ओळखपत्र असणे बंधनकारक करण्याबरोबरच वेळेत कार्यालयीन कामकाज करावे, तसेच ड्रेसकोड असावा, असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांनी केलेल्या कार्यवाहीचे सुरुवातीला कौतुक करण्यात आले होते. मात्र जिल्हा परिषद सदस्यांना कक्षाबाहेर थांबविणे, पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान न ठेवणे, याबाबत थेट सर्वसाधारण सभेतूनच जिल्हा परिषद सदस्यांनी दीपककुमार मीना यांच्यावर टीका केली होती. काही वेळा बैठकांमधून थेट खातेप्रमुखांना अपमानास्पद वागणूक देणे, खातेप्रमुखांना स्वत:च त्यांच्या नस्त्या आणण्याचे आदेश व वेळेत नस्त्या न काढण्यासह आढावा बैठकांमधून वारंवार खातेप्रमुखांना निरुत्तर करणे, एकाच दिवसात अकरा अकरा परिपत्रके काढणे, यांसह अन्य बाबींमुळे दुखावलेले खातेप्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात विरोधात दुखावल्याची चर्चा होती. त्यातच दोन दिवसांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वच खातेप्रमुखांची सेवापुस्तके त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेल्याची चर्चा आहे. त्यामुळे आधीच दुखावलेले सर्व खातेप्रमुख एकत्र येऊन त्यांनी याबाबत थेट विभागीय आयुक्तांकडेच न्याय मागण्याची भूमिका घेतल्याचे कळते. या एकूणच घडामोडींबाबत खातेप्रमुख माध्यमांकडे अवाक्षरही बोलण्यास तयार नाहीत. काही प्रमुखांनी नाव न छापण्याच्या अटीवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात खातेप्रमुखांमध्ये असंतोष खदखदत असल्याची कबुली दिल्याने या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.