जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित
By Admin | Updated: April 14, 2015 01:39 IST2015-04-14T01:36:31+5:302015-04-14T01:39:03+5:30
जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित

जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित
नाशिक : मोठा गाजावाजा करून सर्व नागरिकांना बॅँक व्यवहारात सहभागी करून घेण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या जनधन योजनेतील खातेदार धनापासून वंचित असून, या खातेधारकांचा विमा आणि त्याची रक्कम याबाबत कोणालाच माहिती नसल्याने विमा रकमेबद्दल बॅँकांनीही हात वर केले आहेत.जनधन योजना सुरू झाल्यापासून या योजनेतील सहभागी नागरिकांचा विमा काढण्यापासून त्यांना ओव्हरड्राफ्ट देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यांची घोषणा चांगली असली, तरी त्या विम्यासाठी एक लाख रुपयांची तरतूदच केली नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे योजना सुरू झाल्यापासून अपघाती मृत्यू झालेल्या खातेधारकांच्या वारसांची एक लाख रुपयांंऐवजी केवळ ३० हजार रुपयांवर बोळवण करण्यात आली. त्यातही अनेक खातेधारकांपैकी नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार येथील केवळ ५० खातेधारकांनाच त्यातून मदत दिली गेली. ती देतानाही जनधन योजनेऐवजी आम आदमी योजनेतूनच दिली गेली. त्यामुळे एकप्रकारे अक्षता लावल्याचे बोलले जात आहे. आता तर अनेक खातेधारकांच्या वारसांना विमा रकमेसाठी बॅँकांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. अपघाती मृत्यूचा दाखला दिल्यानंतरही बॅँकांकडून विम्याचे कवच देण्यास टाळाटाळ केली जात असून, विमा कंपनी आणि बॅँक एकमेकांकडे बोट दाखवत आहे. यामध्ये मृत खातेधारकाच्या वारसांची मात्र धावपळ होत असून, त्यांच्या हातात काहीच पडत नसल्याचे चित्र आहे.