आरसेविरहित दुचाकींमुळे रस्त्यांवर अपघात
By Admin | Updated: May 17, 2016 22:31 IST2016-05-17T22:28:48+5:302016-05-17T22:31:35+5:30
जीवघेणी फॅशन : दुचाकीचा ‘शो’ जात असल्याचा अजब निष्कर्ष

आरसेविरहित दुचाकींमुळे रस्त्यांवर अपघात
नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून तरुणांची अजब फॅशन बघावयास मिळत आहे. कंपनीकडून दुचाकींना दिले जाणारे आरसे घरी काढून ठेवत आरसेविरहित दुचाकी रस्त्यावरून मिरवित अपघातांना तरुणवर्ग निमंत्रण देत आहे; मात्र याकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे. आरसा हे वाहनचालकाचे पाठीमागील डोळे आहे, असे म्हटले जाते; मात्र याकडे तरुणाई फारसे गांभीर्याने घेत नाही.
दुचाकीसोबत सर्वच कंपन्यांकडून ग्राहकांना मोफत आरसे दिले जातात. अॅक्सेसरीजमधून आरसे वगळण्यात आले आहे. बहुदा आरसे फुकटात मिळतात म्हणून तर त्याचे महत्त्व काही ‘हौशी’ तरुणांना लक्षात येत नसावे; मात्र आरसे नसल्याने उजवीकडे-डावीकडे वळताना अडचण तर निर्माण होतेच; पण रस्त्यावर सरळपणे दुचाकी चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. मागील वाहन कोणत्या बाजूने व किती वेगाने येत आहे याचा कुठलाही अंदाज बांधणे आरसे नसलेल्या दुचाकी चालविणाऱ्या चालकाला अवघड होते.
परिणामी मागून येणारे वाहन जर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात असेल तर आरसे नसल्यामुळे त्या दुचाकीस्वाराच्या लक्षात येत नाही व तो ज्या ट्रॅकवरून चालला आहे तो ट्रॅक अचानकपणे बदलून ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या वाहनाच्या समोरदेखील अनवधानाने येऊन अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच वळण घेतानाही मागील बाजूने येणारे दुसरे वाहन किती अंतरावर आहे किंवा किती वेगाने येत आहे याचा कुठलाही अंदाज बांधता येत नाही अन् अपघात घडतो. (प्रतिनिधी)