महापालिकेच्यास्तरावरही दुर्घटनेची चौकशी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:32+5:302021-04-23T04:16:32+5:30
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोनाबाधितांचे बळी गेल्यानंतर राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असले ...

महापालिकेच्यास्तरावरही दुर्घटनेची चौकशी होणार
नाशिक : डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे २४ कोरोनाबाधितांचे बळी गेल्यानंतर राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असले तरी नाशिक महापालिकेच्या स्तरावरदेखील चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन टाकीच्या देखभाल-दुरूस्तीची जबाबदारी असलेल्या ठेकेदाराच्या विरोधात देखील फौजदारी कारवाई करण्याचे आदेशदेखील समितीने दिले आहे. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यानंतर बुधवारी (दि. २१) निष्पाप रुग्णांचे बळी गेले. गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीच्या बैठकीत त्याचे तीव्र पडसाद उमटले. सभापती गणेश गीते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यासंदर्भात जोरदार चर्चा करण्यात आली. महापालिकेच्या अन्य रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांविषयीदेखील नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील दुर्घटनेप्रकरणी मात्र महापालिकेच्या रुग्णालयातील वैद्यकीय विभागाचा दोष नसल्याचे सांगत त्यांच्या पाठीशी समिती उभी राहिली.
गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात महापालिकेने बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टाक्या बसविण्याचा निर्णय घेतल्यानंतर बिटकोत २१ आणि हुसेन रुग्णालयात १० केएलची टाकी आणि सिलिंडर भाड्याने दहा वर्षे कालावधीसाठी घेण्यासाठी निविदा मागविल्या. तीनवेळा निविदा मागवल्यानंतरही पुणे येथील टाईयेा निपॉन कंपनीने निविदा दाखल केली. ती मान्य करण्यात आल्यानंतर गेल्यावर्षीच झाकीर हुसेन रुग्णालयात ही टाकी बसविणे आवश्यक होते. मात्र, ती चालूवर्षी ३१ मार्चला बसविण्यात आली. प्रशासनाने जर थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आणि पडताळणी करून टाकीचे इन्स्टॉलेशन केले होते तर मग अवघ्या महिनाभरात नव्या टाकीचा व्हॉल्व्ह फुटला कसा, असा प्रश्न नगरसेवकांनी उपस्थित केला. काँग्रेस नगरसेवक राहुल दिवे यांनी तर या प्रकरणात निविदा प्रक्रिया राबविणारे अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर दोषी असल्याचा आरोपही केला. त्यानंतर अन्य नगरसेवकांनीदेखील या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. ऑक्सिजन टाकीची देखभाल दुरूस्ती करण्याची दहा वर्षे जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे आहे. घटना घडली तेव्हा ठेकेदाराचे तांत्रिक अधिकारी तेथे होते काय, असा प्रश्न करत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
याप्रकरणी शासन आपल्या स्तरावर चौकशी करणार असले महापालिकेच्या स्तरावर ऑक्सिजन टाकीसाठी निविदा प्रक्रिया कोणी राबविली, ठेकेदाराची जबाबदारी काय होती या सर्व बाबींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आल्यानंतर सभापती गणेश गीते यांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली तसेच संबंधित ठेकेदारावरदेखील फौजदारी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
चर्चेत राहुल दिवे, सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडेकर, प्रतिभा पवार, सलीम शेख, इंदुमती नागरे, योगेश हिरे यांच्यासह अन्य सदस्यांनी भाग घेतला.
इन्फो...
ऑक्सिजन ऑडिटसाठीही समिती
महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळतीमुळे दुर्घटना घडली परंतु अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा साठा संपला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा पुरवठा तसेच वापर यासंदर्भातील सर्व माहितीचे ऑडिट करण्यासाठी नाशिक महापालिकेने ऑक्सिजन ऑडिट समिती स्थापन केली आहे. नगरसेवक आणि अधिकाऱ्यांचा या समितीत समावेश आहे.