निफाडजवळ ट्रॉली बसवर आदळून अपघात
By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-06T23:23:47+5:302016-06-07T07:32:05+5:30
निफाडजवळ ट्रॉली बसवर आदळून अपघात

निफाडजवळ ट्रॉली बसवर आदळून अपघात
निफाड : तालुक्यातील बोकडदरे गावाजवळ नाशिक - औरंगाबाद रोडवर रविवारी रात्री उसाने भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीची पिन निसटल्याने सदर ट्रॉली माघारी वेगाने येऊन पाठीमागून येणाऱ्या बोरिवली - औरंगाबाद बसवर आदळल्याची घटना घडली. सुदैवाने या विचित्र अपघातात बसमधील कोणीही जखमी झाले नाही.
निफाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १२च्या सुमारास वाडीलाल हेमा राठोड (रा. चाळीसगाव) हा ट्रॅक्टरला (क्र. एमएच १९ बीजे ०३२) दोन उसाच्या ट्रॉल्या भरून विंचूरकडे जात होता. बोकडदरे गावाजवळ शिवाजी सानप यांच्या वस्तीजवळ चढ्यावर रास्ता ओलांडताना या वेगाने चाललेल्या ट्रॅक्टरच्या जोडलेल्या दोन ट्रॉलीपैकी मागील ट्रॉलीची पिन अचानक निसटल्याने सदर उसाने भरलेली ट्रॉली माघारी वेगाने येऊन या ट्रॅक्टरच्या मागून येणाऱ्या बोरिवली - औरंगाबाद बसवर जोरदार आदळली.
त्यामुळे बसचे पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले, मात्र या अपघातात कुणीही प्रवासी जखमी झाला नाही. ट्रॅक्टरचालक राठोड याच्याविरुद्ध निफाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नागरे करीत आहेत. (वार्ताहर)