नांदूरशिंगोटेत अपघात; आईसह दोन मुलांचा मृत्यू
By Admin | Updated: June 3, 2016 23:40 IST2016-06-03T23:34:57+5:302016-06-03T23:40:32+5:30
काळाचा घाला : उभ्या ट्रकवर कार आदळली

नांदूरशिंगोटेत अपघात; आईसह दोन मुलांचा मृत्यू
नांदूरशिंगोटे : उभ्या ट्रकवर इंडिगो कार आदळून झालेल्या भीषण अपघातात संगमनेर येथील बेग कुटुंबातील आई व दोन मुलांचा मृत्यू झाला. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर नांदूरशिंगोटे शिवारात सदर अपघात झाला.
संगमनेर येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक इसाक उमार बेग हे त्यांच्या कुटुंबीयांसमवेत कसारा येथे नातेवाइकांच्या विवाह सोहळ्यासाठी गेले होते. कसारा येथून गुरुवारी दुपारी ते संगमनेरकडे आपल्या इंडिगो कारने (क्र. एमएच १६ एबी ४१५७) परत निघाले होते. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास बेग यांची इंडिगो नांदूरशिंगोटे शिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकवर (क्र. एमएच १२ एफसी ७३१७) जाऊन धडकली. ट्रकचालक ट्रक रस्त्याच्या कडेला उभी करून हॉटेलमध्ये जेवण करीत होता. ट्रकवर कार आदळताच मोठा आवाज झाला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या भीषण धडकेमुळे कारमधील सना इसाक बेग (२५) यांच्यासह त्यांची सात वर्षीय मुलगी माविया व दोन वर्षाचा मुलगा अली यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविले. मृतांचे शवविच्छेदन संगमनेर येथील पालिका रुग्णालयात करण्यात आले.
या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू
आहे. (प्रतिनिधी)