दुर्घटना : मालेगाव-मनमाड रस्ता ट्रक-कंटेनर धडकेत चार ठार
By Admin | Updated: July 8, 2015 23:55 IST2015-07-08T23:54:49+5:302015-07-08T23:55:31+5:30
दुर्घटना : मालेगाव-मनमाड रस्ता ट्रक-कंटेनर धडकेत चार ठार

दुर्घटना : मालेगाव-मनमाड रस्ता ट्रक-कंटेनर धडकेत चार ठार
मालेगाव : मालेगाव - मनमाड रस्त्यावर वसंतपुष्प हॉटेलजवळ ट्रक-कंटेनर यांच्यात बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात चार जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. अपघातातील तीन मृतांची ओळख पटू शकली नाही.
मनमाड चौफुलीपासून काही अंतरावर सकाळी ७ वाजेच्या सुमारास लिंबांनी भरलेल्या ट्रकने कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. यात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले. ट्रक (क्र. एमआर ६३ ए ९१९८) हा मनमाडहून मालेगाकडे येत होता तर कंटेनर (क्र. एनएल ०२ जी १५४३) हा मनमाडकडे जात होता. अपघात झाल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली. अपघातात ट्रकचालक व त्याचे सोबत असलेले दोन प्रवासी असे तिघे जागीच ठार झाले. गंभीररीत्या जखमी झालेल्या तरुणास उपचारार्थ सामान्य रुग्णालयात नेत असताना त्याचाही मृत्यू झाला. अत्यवस्थ स्थितीत एकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी झालेल्या केशव राय (३५) रा. रामपुरपट्टी (उत्तर प्रदेश) यास खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दुपारपर्यंत मृतांपैकी ट्रकचालक अंगद भारती रामपूरपट्टी (उत्तर प्रदेश) याचीच ओळख पटली होती. उर्वरित तिघांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. किल्ला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. महामार्ग पोलीस पथकाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर पाटील, पोलीस निरीक्षक रमेश चौधरी, वाहतूक शाखेचे पोलीस उपअधीक्षक एम. बी. कोरे, पोलीस उपअधीक्षक महेश सवाई यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली. (प्रतिनिधी)