हादरे देणारे साहित्य स्वीकारा
By Admin | Updated: October 18, 2015 23:48 IST2015-10-18T23:46:28+5:302015-10-18T23:48:53+5:30
परिसंवादातील सूर : ‘ढासळती सामाजिक मूल्ये व साहित्य’ विषयावर मेळाव्यात मंथन

हादरे देणारे साहित्य स्वीकारा
नाशिक : साहित्यिक कोणाच्या सोयीने लिहीत नाहीत. बाजारपेठ पाहून लिहिणारे लोक काळाच्या कसोटीवर टिकत नाहीत. साहित्यिकांना त्यांच्या पद्धतीने व्यक्त होऊ द्या. साहित्यातून वास्तव मांडले जात असेल, तर ते हादरे समाजाने स्वीकारले पाहिजेत, असा सूर परिसंवादात निघाला.
सावानाच्या साहित्यिक मेळाव्यात भोजनोत्तर सत्रात ‘ढासळती सामाजिक मूल्ये आणि साहित्य’ या विषयावर डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवाद रंगला. विनायकदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. इंदिरा आठवले, प्रा. डॉ. संजय साळवे व प्रा. अंजली पटवर्धन-कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.
पाटील म्हणाले, मूल्यांची काटेकोर व्याख्याच नसून, ती स्थळकालपरत्वे बदलते. त्यामुळे मूल्ये ढासळली की सावरली, हे ठरवणे अवघड आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात संस्कृतीचे विविध स्तर पाहायला मिळतात. लेखक त्या-त्या स्तराचे अनुभव मांडत असतो; मात्र काही व्यक्ती या स्वातंत्र्यावर गदा आणू पाहतात, हे काळजी करण्यासारखे आहे. समाजाने न्यायाधीश नव्हे, वकिलाच्या भूमिकेत असावे. समाजाचे वास्तव साहित्यात उमटत नाही म्हणायचे आणि असे साहित्य निर्माण झाल्यावर त्याला विरोध करायचा हा दांभिकपणा आहे. कोणाचा ओरडण्याचा अधिकार हिरावून घेता कामा नये.