दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:11 IST2021-07-19T04:11:18+5:302021-07-19T04:11:18+5:30
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिये दि.३० जूनपासून ...

दहावीच्या निकालानंतर पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेला गती
नाशिक : शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या दहावीनंतरच्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेशप्रक्रिये दि.३० जूनपासून सुरुवात झाली असून इच्छुक विद्यार्थ्यांना २३ जुलैपर्यंत ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे. ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला दहावीच्या निकालापूर्वीच सुरुवात झालेली असली तरी दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंर ऑनलाईन नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.
पॉलिटेक्निकची प्रवेशप्रक्रिया ३० जूनपासून सुरू झाली असली तरी पहिल्या १५ दिवसांत जिल्ह्यात क्षमतेच्या तुलनेत ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करण्याच्या प्रक्रियेला अल्प प्रतिसाद मिळत होता. यात काही विद्यार्थ्यांना त्यांचा बैठक क्रमांक मिळालेला नसल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. तर काही विद्यार्थ्यांनी निकालाची प्रतीक्षा करीत ऑनलाइन नोंदणी केली नाही. मात्र काही विद्यार्थ्यांनी शाळांसोबत संपर्क साधून बैठक क्रमांक मिळवून ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली. आता निकालानंतर या प्रक्रियेला गती मिळाली असून, विविध तंत्रनिकेतन महाविद्यालयांच्या सुविधा केंद्रांवरही विद्यार्थ्यांची वर्दळ वाढली आहे.
पॉइंटर
जिल्ह्यातील पॉलिटेक्निक - २५
एकूण प्रवेशक्षमता - ९२५४
गत वर्षातील प्रवेश- ५१७८
अर्ज भरण्याची अखेरची मुदत - २३ जुलै
बैठक क्रमांकअभावी झाली होती अडचण
कोरोनामुळे यावर्षी दहावीच्या परीक्षा होऊ शकल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्याकडे निकालापूर्वी बैठक क्रमांकच उपलब्ध नव्हता, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होऊनही पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेसाठी नोंदणी अर्ज करता आलेला नव्हता. त्यामुळे निकालापूर्वी ऑनलाइन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाणही अत्यल्प होते.
----
दहावीच्या निकालानंतर प्रक्रियेला वेग
दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना निकालासोबत बैठक क्रमांकही उपलब्ध झाल्या असून त्यामुळे पॉलिटेक्निक प्रवेशप्रक्रियेलाही वेग मिळाला आहे. अनेक विद्यार्थी सुविधा केंद्रांवर जाऊन प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करून लागले असून, मागील वर्षापेक्षा यावर्षी पॉलिटेक्निक प्रवेशाचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे.
गेल्यावर्षी ४४ टक्के जागा रिक्त
गतवर्षी पॉलिटेक्निक प्रवेशाला विद्यार्थ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ऑनलाइन अर्जाची मुदत दोन महिने वाढवून देण्यात आली. तरही जिल्ह्यात सुमारे ४४ टक्के जागा रिक्त राहिल्या होत्या. त्याचा परिणाम यावर्षीच्या प्रवेशप्रक्रियेवरही दिसून येण्याचा अंदाज व्यक्त होत होता. मात्र दहावीच्या निकालानंतर ऑनलाइन अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे,
---
सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करताना तसेच कागदपत्रांच्या स्कॅन प्रति अपलोड करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने बहुतांश सर्वच पॉलिटेक्निक महाविद्यालयांना सुविधा केंद्रांची सुविधा पुरविण्याची मान्यता दिली आहे.परंतु सुविधा केंद्रावर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी पर्याय निवडण्याची गळ घालण्याचे प्रकार घडत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.
- अंकित जाधव, विद्यार्थी
ऑनलाइन नोंदणी करताना विद्यार्थ्यांना संथ इंटरनेट व कागदपत्र स्कॅन करून अपलोड करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहेस तर सुविधा केंद्रावर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गर्दी होत असल्याने बराच वेळ प्रतीक्षा करावी लागते आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी व कागदपत्र अपलोड करताना मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे.
- प्रेरणा तोकडे, विद्यार्थिनी
-------
दहावीच्या निकालानंतर ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. निकालापूर्वी शाळांनी विद्यार्थ्यांना बैठक क्रमांक उपलब्ध करून दिले होते. परंतु काही विद्यार्थ्यांना ते मिळू शकलेले नसल्याने सुरुवातीच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला होता. परंतु, आता निकालानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे.
- प्रकाश कडवे, प्राचार्य, के. के. वाघ, पॉलिटेक्निक