पारितोषिक रकमेचा दुरुपयोग
By Admin | Updated: March 31, 2016 23:04 IST2016-03-31T23:02:46+5:302016-03-31T23:04:13+5:30
शिरसगाव तंटामुक्त समिती : ग्रामसेवकाच्या चौकशीची मागणी

पारितोषिक रकमेचा दुरुपयोग
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील शिरसगावला मिळालेले प्रथम क्रमांकाचे तंटामुक्तीच्या रक्कमेची ग्रामसेवकाने परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप ग्रामस्थ व तंटामुक्ती समितीच्या सदस्यांनी केला आहे. त्यामुळे गावातील विकासकामे झाली नसल्याने यात भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी करण्यात आली आहे.
शिरसगाव या ३१०० लोकवस्तीच्या गावात बहुतांश शेतकरी कुटुंब वस्तीवरच वास्तव्यास आहे. गावात मोलमुजरी करणारे तसेच आदिवासी कुटुंब मोठ्या संख्येने आहे. काही वर्षांपूर्वी पोलीस ठाण्यात काळ्या यादीत असलेल्या या गावाला सन २०१३-१४ साली तंटामुक्तीचे प्रथम पारितोषिक मिळाले. तंटामुक्तीच्या सदस्यांनी गावातील कुठलेही किरकोळ भांडण स्थानिक पातळीवरच मिटविण्यात येत असल्यामुळे गावाला ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.पी. वाघ यांच्या सहकार्याने चार लाखांचे बक्षीस मिळाले.
२०१३मध्येच बक्षिसाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाली. मात्र ग्रामसेवक शिवाजी सुनबे यांनी सदरची रक्कम कुठे खर्च केली याची कोणालाच माहिती दिली नाही. सदर बक्षिसातून सुरू केलेल्या शौचालयाचे बांधकाम अर्धवट आहे. तंटामुक्तीच्या सदस्यांनी वेळोवेळी सदर शौचालय हे आदिवासी वस्तीत बांधावे म्हणून विनंती केली होती. मात्र ग्रामसेवकाने गावात प्रवेश करणाऱ्या ठिकाणीच शौचालय बांधले आहे. सुनबे यांच्या मनमानी कारभारामुळे ग्रामस्थांना उघड्यावर शौचास बसावे लागत असून, गाव विकासकामांपासून वंचित राहिले आहे.
सदर रकमेबाबत विचारणा केली असता ग्रामसेवक उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप
तंटामुक्त सदस्यांनी केला आहे. सहा वर्षात भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांच्या सखोल चौकशीची मागणी २०१३ मधील तंटामुक्ती समितीचे सदस्य रंगनाथ मोरे, अण्णा मोरे, सुभाष मोरे, दिनकर आरगडे, सलीम पटेल, मनोहर भोसले, सुरेश बोंबले, भीमराव मोरे आदिंनी केली आहे. (वार्ताहर)