साधु-महंतांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
By Admin | Updated: February 22, 2015 00:21 IST2015-02-22T00:21:15+5:302015-02-22T00:21:48+5:30
फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक : सरकारचे सोयीस्कर मौन

साधु-महंतांच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता
नाशिक : पवित्र गोदावरीचे शुद्धीकरण करा, सिंहस्थ कुंभमेळा-त्र्यंबकेश्वर अशी घोषणा करा, आखाड्यांच्या जागा सरकारने विकसित कराव्या, भाविकांच्या सोयीसाठी निवाराशेडची व्यवस्था करा, अशा एक नव्हे अनेक मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढ्यात साधु-महंतांनी मांडल्या खऱ्या, परंतु त्यातील एकाही मागणीला सरकारने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने त्र्यंबकेश्वर येथे झालेली बैठक निव्वळ साधु-महंतांच्या समाधानासाठी व सरकारही काही तरी करते हे दाखविण्यासाठीच होती हे स्पष्ट झाले आहे. त्र्यंबकेश्वर येथे शैव पंथियांचे दहा आखाडे असून, गेल्या काही महिन्यांपासून त्यांची कुंभमेळ्याची तयारी व नियोजनाबाबत राज्य सरकार विषयी तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची भूमिका समजावून घेण्यासाठी शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी बोलताना महंत हरिगिरीजी यांनी त्र्यंबकेश्वरलाच कुंभमेळ्याचा खरा मान असून, हा आजवरचा इतिहास आहे. इंग्रजांच्या काळात काही व्यक्तींच्या मागणीवरून नाशिकला स्नान करण्यास सुरुवात झाली, परंतु खरा मान त्र्यंबकेश्वरचा असल्याने या संदर्भात शासनाने नाशिक नव्हे तर ‘त्र्यंबकेश्वर कुंभमेळा’अशी घोषणा करावी, अशी मागणी केली. त्र्यंबकेश्वर हे पवित्र ठिकाण असल्याने या शहराच्या आसपास सुमारे २० किलोमीटरपर्यंत मांस व मद्यविक्रीवर बंदी घालावी, त्र्यंबकेश्वर ते नाशिक या वीस किलोमीटर अंतरावर गोदावरी नदीवर घाट बांधून या ठिकाणी सोडले जाणारे सांडपाणी पूर्णपणे बंद करावे, दरवर्षी त्र्यंबकेश्वरला दहा लाखांहून अधिक भाविक येतात, त्यांच्या शौचालयाची व स्वच्छतागृहाची कोणतीही व्यवस्था शहरात नसल्याने अस्वच्छता फैलावते त्यासाठी कायम स्वरूपी शौचालये बांधा, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी निवारा शेड बांधून त्यांना सुविधा पुरवा, अशी मागणीही त्यांनी केली, तर महंत नरेंद्रगिरी महाराज यांनी, त्र्यंबकेश्वरला धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करा, आखाड्यांकडे मुबलक जागा असल्याने त्यांच्या विकासासाठी मूलभूत सुविधा पुरवा, कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना येण्यापासून रोखू नका, कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी स्वतंत्र आयएएस अधिकाऱ्यांची नेमणूक करा व त्यांना काम करण्यासाठी पूर्ण अधिकार द्या, आखाड्यांच्या जागा विकसित करून द्या, आदि मागण्या केल्या. महंत सागरानंद यांनी कुंभमेळ्याची कामे गतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत फक्त तिघा महंतांनाच आपले विचार मांडू देण्यात आले व त्यातही त्यांना थोडक्यात मांडण्याचा सल्लाही देण्यात आला. त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकही ठोस आश्वासन दिले नाही. उलट त्र्यंबकेश्वर धार्मिकस्थळ म्हणून घोषित करण्याची गरज नसल्याचे सांगितले तर मांस-मद्यविक्री बंद करण्याबाबत साधु-महंतांच्या भावनेची कदर केली जाईल, असे सांगितले. पुढच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत गोदावरी स्वच्छ व निर्मळ होईल, असे सांगून साधुंच्या मुख्य मागणीला बगल दिली. पारदर्शकता झाकण्यासाठी... मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेली कुंभमेळा कामकाज आढावा बैठक गोपनीय व्हावी यासाठी प्रशासनाने पुरेपूर प्रयत्न केले. त्याचाच भाग म्हणून या बैठकीच्या वृत्तांकनासाठी गेलेल्या प्रसिद्धीमाध्यमांनाही बैठकीत बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. मुळात कुंभमेळ्याची कामे सर्वत्र उघडपणे केली जात असताना व राज्य सरकारही वेळोवेळी पारदर्शक कारभाराची हमी देत असताना विभागीय आयुक्तांनी मात्र ही पारदर्शकता झाकण्याचा प्रयत्न केला. या बैठकीसाठी निवडक व्यक्तींनाच निमंत्रण देऊन प्रशासनाचे अपयश झाकण्याचा हा हेतू असल्याची तक्रार अनेकांनी बैठकस्थळी केली, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत केलेल्या घुसखोरीकडे विभागीय आयुक्तांनी सोयीस्कर डोळेझाक केली. प्रशासनाच्या कामकाजावर साधु-महंतांनी यापूर्वीच नाराजी व्यक्त केलेली असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुढ्यात ती पुन्हा जाहीर व्यक्त करू नये यासाठी त्यांना पायघड्या घालतानाच, यदाकदाचित त्यांनी नाराजी व्यक्त केली, तर त्याला प्रसिद्धी मिळू नये यासाठीच विभागीय आयुक्तांनी केलेला सारा खटाटोप मात्र पालकमंत्री महाजन यांनी प्रसिद्धीमाध्यमांना बैठकीसाठी पाचारण करून उधळून लावला.