पालिकेत सुमारे तीन कोटींचा घोटाळा
By Admin | Updated: July 18, 2014 00:34 IST2014-07-17T23:06:13+5:302014-07-18T00:34:30+5:30
महिला प्रशिक्षण : सभापतींनीच केली फौजदारी कारवाईची मागणी

पालिकेत सुमारे तीन कोटींचा घोटाळा
नाशिक : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असताना पै पै वाचविण्याचे सोडून उलट कोट्यवधी रुपयांच्या उधळपट्टीचे पद्धतशीर षडयंत्र रचले जात आहे. महिला व बालकल्याण विभागाच्या माध्यमातून महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अशाच प्रकारे तब्बल ६० टक्के कमी दराची निविदा आली असताना, मूळ रक्कम खर्ची पाडण्यासाठी लाभपात्र महिलांच्या संख्येत अचानक वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या सभापती सविता दलवाणी यांनीच आक्षेप घेतला असून, संबंधितांची चौकशी करावी तसेच फौजदारी करवाई करावी यासाठी त्यांनी आयुक्तांना साकडे घातले आहे.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात येणारे प्रशिक्षण वेळोवेळी वादग्रस्त ठरले आहे. यंदाही असाच प्रकार घडला. यंदाच्या वर्षी अठरा हजार महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी महापालिकेने २५ डिसेंबर २०१३ रोजी निविदा मागविल्या. त्यानुसार १८ हजार महिलांना एकूण १९ प्रकारचे प्रशिक्षण देण्याचे ठरले होते. सहा विभागांसाठी मागविण्यात आलेल्या एकूण निविदांची रक्कम चार कोटी ७५ लाख रुपये होती. सहा विभागांपैकी पूर्व विभागात केवळ दोनच निविदा प्राप्त झाल्या असताना त्या उघडण्यात आल्या. हीच बाब संशयास्पद आहे. त्यानंतर न्यूनतम निविदाधारकांनी भरलेले दर हे प्राकलन दरापेक्षा ६० टक्के कमी दराने प्राप्त झाले होते. त्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी २८ फेब्रुवारी रोजी स्थायी समितीवर या निविदा मांडल्या. त्यावेळी एक कोटी ९० लाख रुपयांच्या निविदांच्या दरास मान्यता असताना, लाभपात्र व्यक्तींची संख्या वाढविण्यात आली आणि तब्बल दोन कोटी ८५ लाख रुपयांचा वाढीव खर्च केल्याने पालिकेला भुर्दंड बसला आहे. त्यामुळे महापालिकेचे इतके नुकसान झाले असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी दलवाणी यांनी आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.