अधिकाऱ्यांसह सुमारे ७ हजार पोलीस तैनात
By Admin | Updated: July 3, 2015 00:56 IST2015-07-03T00:53:43+5:302015-07-03T00:56:05+5:30
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्र्यंबकेश्वरला यंत्रणा सज्ज

अधिकाऱ्यांसह सुमारे ७ हजार पोलीस तैनात
त्र्यंबकेश्वर : मागील सिंहस्थ कुंभमेळ्याचा अनुभव, तसेच यंदा होणाऱ्या चौपट गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेने पुरेपूर काळजी घेतली असून, या कामी पोलीस बल, सीसीटीव्ही यंत्रणा, बॅरिकेट्स व भोंगे (स्पीकर) आदिंचा वापर करण्यात येणार आहे. ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते, आयपीएस दर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे आदि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण पोलीस यंत्रणेने बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. गत १२ वर्षांपूर्वी नाशिक येथे सरदार चौकात चेंगराचेंगरी झाली होती. त्यात अनेकांना प्राणास मुकावे लागले होते. कुशावर्त चौकातही चेंगराचेंगरीचा प्रकार होता होता वाचला होता. तत्कालीन नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंघल यांनी गर्दीत शिरून गर्दी काबूत आणली होती. याकामी त्यांचे अधिकारी व पोलीस जवान यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते आणि तो कटू प्रसंग टळला. त्यामुळे येणारी गर्दी लक्षात घेऊन तसेच त्र्यंबकेश्वरच्या भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून ठिकठिकाणच्या चौकातील होणारी गर्दी आदिंचा अनुभव लक्षात घेऊन सुमारे ६५०० ते ७००० पोलीस बळ वापरण्यात येणार आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी, पो.नि., स.पो.नि., पो.उ.नि. असे अधिकारी, महिला पोलीस, पोलीस जवान मिळून सारे पोलीस प्रत्येक पर्वणीला गर्दीवर नियंत्रण करतील. तसेच गर्दीतील लोकांवर लक्ष ठेवतील. विशेष म्हणजे पोलिसांच्या ताफ्यात कदाचित एसआरपी दंगल नियंत्रण दल आदिंचाही समावेश असण्याची शक्यता आहे.