मालेगाव तालुक्यात शासकीय कार्यालयातील सुमारे १६० पदे रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:16 IST2021-08-15T04:16:44+5:302021-08-15T04:16:44+5:30
मालेगाव : तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील सुमारे १६० पदे रिक्त असल्याने विकासकामांचा बोजवारा उडालेला आहे. दुष्काळी व ...

मालेगाव तालुक्यात शासकीय कार्यालयातील सुमारे १६० पदे रिक्त
मालेगाव : तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांमधील सुमारे १६० पदे रिक्त असल्याने विकासकामांचा बोजवारा उडालेला आहे. दुष्काळी व अवर्षणग्रस्त विकसनशील तालुक्याच्या विकासाला त्यामुळे मोठी खीळ बसलेली आहे.
पंचायत समितीत २४ पदे रिक्त
मालेगाव तालुका पंचायत समितीत मंजूर ६० पदांपैकी तब्बल २४ पदे रिक्त आहेत. तालुक्यात १२४ ग्रामपंचायतींसाठी अवघे २४ ग्रामसेवक कार्यरत असल्याने, गावविकासाची सर्वच कामे ठप्प झाली आहे. तालुक्यात तब्बल ५२ ग्रामपंचायतींचा कारभार अतिरिक्त अधिभाराने सुरू असल्याने विकासाला खीळ बसली आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष त्यास कारणीभूत असल्याने ५२ गावांमधील सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजीची भावना निर्माण झालेली आहे. यामुळे सन २०१९-२० मधील मंजूर १ हजार ३६५ घरकुले २०२०-२१ मधील मंजूर ३ हजार १६४ घरकुलांची कामे पूर्णत्वास जाऊ शकलेली नाहीत, ती अपूर्णच आहेत. दोन्ही वर्षांतील एकूण ७३ पशुगोठ्यांची कामेही अपूर्ण आहेत.
--------------
२५ योजना धूळखात
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बेरोजगारांना काम व विकासकामांच्या संकल्पनेतून विविध २८ योजना सरकारमार्फत राबविण्यात येत आहेत. त्यापैकी मालेगाव पंचायत समितीच्या २८ पैकी फक्त ३ योजनांवर काम सुरू असून, २५ योजना धूळखात पडल्या आहेत. रिक्त पदांमुळे अनेक विकासकामांना ब्रेक लागला आहे.
नऊपैकी ५ पशुवैद्यकीय पदे रिक्त तालुक्यात ९ पैकी ५ पशुवैद्यकीय पदे रिक्त आहेत.
---------------------
आरोग्य यंत्रणेवर ताण
शासकीय मानकाप्रमाणे मालेगाव तालुक्यात ९ पैकी ५ केंद्रांना पशुवैद्यकीय अधिकारीच नसल्याने पाळीव पशुंचे लसीकरण आणि त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
आरोग्य विभागात तब्बल १२१ पदे रिक्त:
तालुक्याच्या आरोग्य विभागाची आहे. कोरोना आणि इतर साथीचे आजार गाव खेड्यांत असताना, तालुक्यातील आरोग्य विभागात तब्बल १२१ पदे रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रातील कार्यरत कर्मचारी आरोग्याचा गाडा अक्षरशः ओढत आहेत. मालेगाव तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्र व ५० आरोग्य केंद्रांवर विविध ३३९ पदांपैकी १२१ पदे रिक्त आहेत. म्हणजे तब्बल ४० टक्के पदे रिक्त असल्याने, आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाल्याने ही पदे तातडीने भरण्याची आवश्यकता आहे.
------------------
रिक्त पदांबाबत गांभीर्याने लक्ष घालू : महसूलमंत्री थोरात
दुष्काळी व अवर्षणग्रस्त विकसनशील मालेगाव तालुक्याच्या विकासाला गती मिळावी, यासाठी वरील सर्व रिक्त पदे भरण्यात येऊन तालुक्याच्या विकासाला आपला मोलाचा हातभार लाभावा, अशी विनंती प्रसाद हिरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. त्यावेळी थोरात यांनी रिक्त पदांबाबत गांभीर्याने लक्ष घालू, अशी ग्वाही यावेळी दिली. शिष्टमंडळात बाजीराव निकम, रमेश बच्छाव, चंद्रकांत गवळी, रामराव शेवाळे, भाऊसाहेब वाघ आदी कार्यकर्ते सहभागी झाले.