अभ्यागतांसाठी साकारले अभिनव ‘कम्युनिटी किचन’
By Admin | Updated: September 15, 2015 23:45 IST2015-09-15T23:42:16+5:302015-09-15T23:45:13+5:30
सुमती सोसायटी : महिलांचे व्यवस्थापन; पर्वणीत घडवतात एकीचे दर्शन

अभ्यागतांसाठी साकारले अभिनव ‘कम्युनिटी किचन’
नाशिक : कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या पाहुणांची सरबराई आणि अन्य कामे करताना साऱ्याच कुटुंबांची दमछाक होते; परंतु सर्वांनीच एकत्रितरीत्या सर्वच पाहुण्यांसाठी कामे करून घेतली तर कामाचा ताण कमी होतो आणि हसत खेळत कामेही पार पडतात. शहरातील शास्त्रीनगर येथील सुमती सोसायटीने असाच उपक्रम राबविला असून, चौदा कुटुंबांनी एकत्रित येऊन कम्युनिटी किचन सुरू केले आहे. आत्तापर्यंत सहा हजार पाहुण्यांना या उपक्रमातून तृप्त केले आहे.कुंभमेळा म्हटला की भाविक नाशिकमध्ये स्नान आणि देवदर्शनासाठी येतात आणि अर्थातच आपल्या नातेवाईक किंवा परिचितांकडे उतरण्यास प्राधान्य देतात. साहजिकच ते ज्या कुटुंबांमध्ये उतरतात, तेथील महिलांची खूपच धावपळ होत असते. हेच लक्षात घेऊन गेल्या तीन कुंभमेळ्यापासून सुमती सोसायटीत कम्युनिटी किचन संकल्पना रुजली आहे. चौदा कुटुंब एकत्र येऊन आर्थिक भार उचलतात आणि घरातील महिला स्वयंपाकघराची जबाबदारी घेतात. सर्व पाहुण्यांना सोसायटीच्या मध्यवर्ती ठिकाणी मंडपात भोजनाचा आस्वाद दिला जातो. सर्वच घरातील पाहुणे आणि सर्व कुटुंब एकत्रितरीत्या स्नेहभोजन करतात. वाढण्याची जबाबदारीही या महिलाच पार पाडतात.
या उपक्रमात कमलाबाई धूत, सावित्री भुतडा, आशाताई मालपाणी, कमलाबाई मणियार, निर्मल मुंदडा, विजया मुंदडा, प्रेमलता नावंदर, सुमनबाई सोनी, रक्षा साबू आणि अनिता कासट या महिला सहभागी झाल्या असून, त्याच सर्व कम्युनिटी किचनची व्यवस्था सांभाळतात.