ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ
By Admin | Updated: October 21, 2015 22:58 IST2015-10-21T22:58:29+5:302015-10-21T22:58:55+5:30
विंचूर : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; पोलीस चौकीवर मोर्चा

ग्रामविकास अधिकाऱ्यास शिवीगाळ
विंचूर : येथील ग्रामविकास अधिकारी तसेच ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गावातील इसमाने शिवीगाळ केल्याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी जी. टी. खैरनार दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले आहेत, तर ग्रामपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारल्याने गावातील साफसफाई, पाणीपुरवठा यांसह ग्रामपालिकेचे कामकाज ठप्प झाल्याने ग्रामपालिकेचे सदस्य व कर्मचारऱ्यांसह ग्रामस्थांनी संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करीत येथील पोलीस औटपोस्टवर मोर्चा काढला. संबंधित इसमावर गुन्हा दाखल झाल्याने दुपारनंतर आंदोलनमागे घेण्यात आले.
मंगळवारी ग्रामविकास अधिकारी जी.टी. खैरनार हे लासलगाव पोलीस ठाण्यÞाचे सहायक पोलीस निरीक्षक सानप यांच्या सांगण्यावरून साळुंके यांच्या घराबाहेरील कचरा भरावयास ग्रामपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह गेले असता, संबंधित इसमाने खैरनार यांना शिवीगाळ केली. तसेच दगड घेऊन खैरनार यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. संबंधित इसमाने यापूर्वीही ग्रामपालिकेच्या कामात अडथळा आणणे, अधिकारी, पदाधिकारी यांना शिवीगाळ करणे तसच अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यावर आतापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर इसम फक्त पोलीस स्टेशनच्या हिमतीवरच अशा प्रकारचे कृत्य करीत असून, संपूर्ण गावाला वेठीस धरले आहे, असा आरोप करीत ग्रामविकास अधिकारी बुधवारपासून दीर्घ मुदतीच्या रजेवर गेले तर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले.
सदस्यांसह कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतपासून पोलीस औटपोस्टवर मोर्चा काढला. ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करीत संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप यांनी विंचूर येथे येऊन संबंधित इसमावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे सांगून संबंधितास लासलगाव पोलीस ठाण्यात घेऊन गेले. दरम्यान, दुपारी संबंधित इसमावर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांनी दुपारनंतर आंदोलन मागे घेतले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, शकुंतला दरेकर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तीन वर्षे : बंद असलेले मंदिर केले खुले संबंधित इसमाने येथील न्हावी समाजाचे मंदिर तीन वर्षांपासून बंद करून ठेवले होते. बुधवारी ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थित मंदिराचे कुलूप तोडण्यात आले. श्रीफळ वाढवून समाजासाठी मंदिर खुले करण्यात आल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले. ग्रामपंचायत प्रशासनाकडून तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर बाळकृष्ण चव्हाण, राजेंद्र शिंदे, श्याम चव्हाण, मनोज चव्हाण, सुरेश काळे, रामदास जाधव, मयूर जाधव, तुकाराम जाधव आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत.