आधाराश्रमात दानशूरांची रीघ
By Admin | Updated: November 12, 2015 00:11 IST2015-11-12T00:10:30+5:302015-11-12T00:11:26+5:30
आशेची पणती प्रज्वलित : निराधार बालकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

आधाराश्रमात दानशूरांची रीघ
नाशिक : दीपावलीचा सण सर्वांच्या आनंदाचा अन् उत्साहाचा. या आनंदात प्रत्येकाला सहभागी होता यावे, यासाठी आज बहुतांश दानशूर व्यक्ती व संस्थांनी अशोकस्तंभावरील आधाराश्रम गाठले. येणाऱ्या प्रत्येकाने त्या निरागस बालकांना मोठ्या प्रेमाने दिवाळीचा फराळ भरविला आणि नवीन कपडेही दिले. यामुळे बालगोपाळांना ‘दिवाळी’ला मोठा ‘आधार’ मिळाला.
या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगातदेखील सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणारे अनेक सहृदयी माणसे मोठ्या संख्येने आहे. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजाचे काही देणं लागतो, या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी आधाराश्रमाचा उंबरा ओलांडला आणि निरागस बालकांसमवेत दिवाळी साजरी केली. यामध्ये काही कुटुंबांबरोबरच सामाजिक संस्था, मित्रमंडळांचाही सहभाग होता.
दीपावलीचा उत्साह शहरात सर्वत्र शिगेला पोहचला असताना गरजू घटकांमध्ये मोडणाऱ्या आधाराश्रमातील बाळगोपाळांनाही दिवाळी तितक्याच उत्साहाने व आनंदात साजरी करता यावी, यासाठी शहरातील बहुतांश संवदेनशील मनाची दानशूर माणसे बुधवारी (दि. ११) सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आधाराश्रमात दाखल होत होती. विशेष म्हणजे येणारा प्रत्येक नागरिक फराळाचे भरगच्च पदार्थ, नवीन कपडे, पादत्राणे, मिठाईचे पुडे, शोभेचे फटाके घेऊन येत होता. यामुळे आधाराश्रमात सकाळपासूनच ‘दिवाळी सेलिब्रेशन’ला सुरुवात झाली होती. नागरिकांच्या वर्दळीमुळे आधाराश्रमात जणू दिवाळीचा सामूहिक सोहळा साजरा केला जात असल्याचे चित्र निर्माण झाले होते. नियतीने जरी आई-वडिलांचे छत्र हिरावून घेतले असले तरी या प्रकाशाच्या उत्सवात बाळगोपाळांच्या आशेची पणती तेवत होती हे त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य सहज सांगून जात होते. आपल्या आयुष्यातही एक ना एक दिवस प्रकाशकिरण पडेल, असा आशावाद घेऊन काही मोठी मुले मोठ्या उत्साहाने आधाराश्रमाच्या उंबरठ्यावर पणत्या प्रज्वलित करत होते. (प्रतिनिधी)