महाबोधी वृक्ष महोत्सवासाठी उपासकांची मांदियाळी; त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दुमदुमला
By Suyog.joshi | Updated: October 24, 2023 18:10 IST2023-10-24T18:10:19+5:302023-10-24T18:10:32+5:30
सवाद्य पालखी सोहळ्याने वेधले लक्ष, महाबोधी वृक्षाचे दर्शन केवळ पोर्णिमेला करता येणार आहे अशी माहिती भदन्त सुगत यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी दिली

महाबोधी वृक्ष महोत्सवासाठी उपासकांची मांदियाळी; त्रिरश्मी बुद्ध लेणी परिसरात दुमदुमला
नाशिक : सजवलेली पालखी, सोबत ढाेल ताशांचा गजर अन वरून पुष्पवृष्टी...अशा वातावरणात श्रीलंकेतील अनुराधापूर येथून आणलेल्या महाबोधी वृक्षाचे रोपण बुद्ध लेणी असलेल्या बुद्ध समारकाच्या परिसरात करण्यात आले. यावेळी हजारो उपासकांची मांदियाळी जमली होती. कार्यक्रमस्थळी बुद्ध शरणम गच्छामी ही बुद्ध उपासना सुरू होती. त्रिरश्मी बुद्धलेणी नाशिक येथे मंगळवारी राज्य शासन व शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीलंकेतील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड
कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याहून निघाले होते. मात्र त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथील दीक्षा भूमीच्या कार्यक्रमामुळे येऊ शकले नाही असे सांगत भुजबळ यांनी मुंबईतील मेळाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले नसल्याचे सांगितले. मात्र शिंदे यांनी कार्यकमाला व्हिडीओच्या माध्यमातून ऑनलाइन शुभेछा दिल्या आहेत. त्या कार्यक्रमस्थळी दाखविण्यात आल्या.
दर पोर्णिमेला होणार दर्शन
महाबोधी वृक्षाचे दर्शन केवळ पोर्णिमेला करता येणार आहे अशी माहिती भदन्त सुगत यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी दिली. यावेळी त्यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले की, या वृक्षाचा इतिहास वेगळा आहे. श्रीलंकेचे हेमरत्न नाय थरो यांच्या प्रयत्नामुळे महाबोधी वृक्ष नाशिकमध्ये आल्याचे सांगितले. ज्या वृक्षाखाली भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या वृक्षाचे जगात अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे नाशिकचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यावर पोहचण्यास मदत होणार आहे.