नाशिक : शेतीच्या जुन्या वादातून दोन सख्ख्या भावांमध्ये गुरुवारी (दि.१६) सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास मळ्याच्या बांधावरच शाब्दिक वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी पुतण्याने काकाचे हात धरून ठेवले आणि सख्ख्या भावाने आपल्या भावाच्या डोक्यात टिकाव हाणला. गंभीररित्या जखमी झालेले बळवंत यशवंत शेळके (५७, रा. यशवंतनगर, पो. मुंगसरा) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाशिक तालुका पोलिसांनी याप्रकरणी पुतण्या संशयित जयदीप शेळके यास ताब्यात घेतले आहे. मौजे जलालपूर शिवारातील शेती गट ६० मध्ये ही घटना घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, बळवंत यशवंत शेळके व त्यांचा सख्खा भाऊ संशयित श्रीहरी कोंडाजी शेळके (६१) यांच्यात सन २०१५ पासून जलालपूर येथील शेतीचा गट ६० वरून वाद सुरू होते. हे वाद न्यायप्रविष्ट आहेत. गुरुवारी सकाळी श्रीहरी यांचा मुलगा जयदीप व पत्नी संशयित सुमनदेखील मळ्यात होत्या. त्यावेळी बळवंत व त्यांचा दुसरा भाऊ यशवंत आणि मुलगा अक्षय शेळके हे मळ्यात जात असताना त्यांनी त्यांचा रस्ता अडविला. त्यांच्यात भांडण सुरू झाल्याने यशवंत व अक्षय या काका पुतण्याने वाद सोडविण्याचा प्रयत्न केला असता संशयित जयदीप याने बळवंत यांना धरून ठेवले व श्रीहरी यांनी बाजूला पडलेला टिकाव उचलून त्यांच्या डोक्यात हाणला. यावेळी संशयित सुमन यांनीही त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, बळवंत यांना त्यांचा मुलगा अक्षय व भाऊ यशवंत यांनी जखमी बळवंत यांना पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र दुपारी त्यांना डॉक्टरांनी मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव हे पथकासह घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी संशयित जयदीप याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. मात्र त्याचे वडील संशयित श्रीहरी व आई सुमन यांचा रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून शोध घेतला जात होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. याबाबत अधिक तपास आहिरराव या करीत आहेत. दरम्यान, शेतजमीनीच्या वादातून झालेल्या या हत्येच्या घटनेने जलालपूरसह मुंगसरा भागात हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत बळवंत यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन सूना, भाऊ, भावजयी असा परिवार आहे.