९९ घरकुलांची सोडत
By Admin | Updated: May 17, 2016 00:09 IST2016-05-16T23:46:11+5:302016-05-17T00:09:49+5:30
९९ घरकुलांची सोडत

९९ घरकुलांची सोडत
नाशिक : महापालिकेने जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनरुथ्थान योजनेंतर्गत मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल साई पॅलेसच्या पाठीमागील जागेत साकारलेल्या घरकुल योजनेसाठी सोमवारी ९९ सदनिकांकरिता सोडत काढण्यात आली. दरम्यान, जुन्या नाशकातील बलसारा झोपडपट्टीमधील लाभार्थ्यांनी गैरहजर राहत सोडतीस विरोध दर्शविला.
महापालिकेच्या वतीने जुन्या नाशकातील शिवनेरी झोपडपट्टीतील ६९ आणि आडगावजवळील वैदुवाडी येथील ३० लाभार्थ्यांसाठी घरकुलांची सोडत काढण्यात आली. यावेळी उपआयुक्त रोहिदास बहिरम, विभागीय अधिकारी वसुधा कुरणावळ आणि स्थानिक नगरसेवक रंजना पवार उपस्थित होत्या. सदर लाभार्थ्यांना हॉटेल साई पॅलेसमागील जागेतील घरकुलांचा ताबा दिला जाणार आहे. सोमवारी जुन्या नाशकातील बलसारा झोपडपट्टीतील २६ लाभार्थ्यांसाठीही सोडत काढण्यात येणार होती; परंतु सर्व लाभार्थ्यांनी सोडतीकडे पाठ फिरविली आणि उपआयुक्तांची भेट घेऊन आहे त्याच जागेवर घरकुल बांधून देण्याची मागणी केली. मात्र, सदर झोपडपट्टी ही डीपी रोडमध्ये असल्याने ती कोणत्याही परिस्थितीत हटविली जाणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपआयुक्त बहिरम यांनी केले आहे.