सिंहस्थ कामांवर ९७१ कोटी खर्च
By Admin | Updated: June 12, 2016 23:38 IST2016-06-12T22:39:23+5:302016-06-12T23:38:04+5:30
महापालिका : शासनाकडे ६८ कोटी रुपये अनुदान शिल्लक

सिंहस्थ कामांवर ९७१ कोटी खर्च
नाशिक : महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत विविध कामांसाठी मंजूर आराखड्यातील एकूण १११९ कोटी रुपयांपैकी ९७०.९२ कोटी रुपये खर्च केले असून, अद्याप शासनाकडून ६८.१३ कोटी रुपये येणे बाकी आहे. दरम्यान, महापालिकेने बचत केलेल्या निधीचा वापर नवीन कामांसाठी करण्याची परवानगी शासनाकडे मागितली आहे.
महापालिकेने सिंहस्थ कुंभमेळ्यांतर्गत विविध कामांसाठी १११९.२९ कोटी रुपयांचा आराखडा शासनाला सादर केला होता. शासनाने भूसंपादन वगळून भांडवली व महसुली कामांसाठी महापालिकेला ९१९.२९ कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली होती. दरम्यान, नागपूर अधिवेशनदरम्यान उच्चाधिकार समितीची बैठक होऊन मुख्यमंत्र्यांनी राज्य शासन ७५ टक्के हिस्सा उचलणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार राज्य शासनाकडून मंजूर अनुदानाच्या ७५ टक्के म्हणजे ६८९.४६ कोटी रुपये महापालिकेला प्राप्त होणे अपेक्षित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने भूसंपादनासह ९७०.९२ कोटी रुपये खर्च केले आहेत. भूसंपादनासाठी मनपाने २३४.७० कोटी रुपये स्वनिधी वापरला आहे. महापालिकेने आपला हिस्सा उभा करण्यासाठी कर्ज काढले होते. त्यासाठी शासनाने महापालिकेला २६० कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यासाठी मान्यता दिली होती. त्यातील ९५ कोटी रुपये कर्ज महापालिकेने उचलले आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याची सांगता ११ आॅगस्टला होत असून त्याला अवघे दोन महिने उरले असताना अद्याप शासनाकडून सिंहस्थाचे पूर्ण अनुदान प्राप्त झालेले नाही. मंजूर अनुदानापैकी शासनाकडून मनपाला ६८.१३ कोटी रुपये येणे अपेक्षित आहे तर भूसंपादनाकरिता ५० कोटी रुपयांचे कर्ज उचलण्यासाठी मंजुरी शासनस्तरावर प्रलंबित आहे. सदर अनुदान आणि बचत केलेले अनुदान यातून नवीन कामे घेण्याची परवानगी महापालिकेने शासनाकडे मागितली आहे. (प्रतिनिधी)