शहरातील ३०२ ठिकाणी ९४३ सीसीटीव्ही कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2016 01:03 IST2016-09-27T01:02:02+5:302016-09-27T01:03:20+5:30
पोलीस आयुक्तालयात बैठक : महापालिका स्मार्ट सिटी समिती सदस्यांचीही उपस्थिती

शहरातील ३०२ ठिकाणी ९४३ सीसीटीव्ही कॅमेरे
नाशिक : शहरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला आहे़ यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने सर्वेक्षणाचा अहवाल पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल व अधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी सादर केला़ यानुसार ३०२ ठिकाणी ९४३ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची आवश्यकता भासणार असून, यामध्ये महापालिकेने आपल्या विविध विभागांचा समावेश केल्यास कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे़
सिंहस्थ पर्वणी कालावधीनंतर तात्पुरते लावलेले सीसीटीव्ही काढून घेण्यात आले़ दरम्यानच्या काळात गुन्हेगारी वाढल्याने कायमस्वरूपी सीसीटीव्हीसाठी पोलीस व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही त्यास मान्यता दिली़ यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने पोलीस ठाणेनिहाय सर्वेक्षण पूर्ण केले असून, त्याचा अहवाल सादर केला आहे़
या सीसीटीव्हींसाठी महापालिकेचेही सहकार्य मिळणार असून आयुक्तालयातील बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांसह महापालिकेच्या स्मार्ट समितीचे प्रतिनिधीदेखील उपस्थित होते़ यावेळी समितीने दिलेल्या डीपीआर (सूक्ष्म सर्वेक्षण अहवाल) अहवालावर व बदलांबाबत चर्चा करण्यात आली़ तर पुढील आठवड्यात लोकप्रतिनिधी, पोलीस अधिकारी व स्मार्ट सिटी समिती प्रतिनिधींची बैठक होणार आहे़ यानंतर पुढील प्रक्रिया वेगाने पार पडण्यासाठी हालचाल केली जाणार आहे़
पोलीस आयुक्तालयात झालेल्या या बैठकीत पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल, पोलीस उपआयुक्त, विजय पाटील, श्रीकांत धिवरे, लक्ष्मीकांत पाटील, दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, राजू भुजबळ, विजय चव्हाण यांसह प्रत्येक पोलीस ठाण्याचे अधिकारी उपस्थित होते़ (प्रतिनिधी)
सीसीटीव्हीच्या संख्येत होणार वाढ
शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार सुमारे ९४३ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत़ अर्थात ही ठिकाणे पोलिसांनी सुरक्षितता, वाहतूक या दृष्टिकोनातून निश्चित केली आहेत़ यामध्ये महापालिका आपली विविध विभागीय कार्यालये, उद्याने, कचरा डेपो, अग्निशमन केंद्र अशी महत्त्वाच्या ठिकाणांची भर घालू शकते़ त्यामुळे सीसीटीव्हींची बसविण्याची ठिकाणे व कॅमेऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते़
आयुक्तालयासह प्रत्येक पोलीस ठाण्यात कंट्रोल रूम
आयुक्तालयातील स्वतंत्र कंट्रोल रूमद्वारे शहरातील सर्व सीसीटीव्हीचे नियंत्रण हे केले जाणार आहे़ याबरोबरच आयुक्तालयातील तेराही पोलीस ठाण्यांना त्यांच्या हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहण्याची सोय असणार आहे़ या व्यतिरिक्त महापालिका व वाहतूक विभागातही अशी व्यवस्था असेल. शहर वाहतूक विभागाला शहरातील सिग्नल यंत्रणा व प्रमुख गर्दीचे रस्ते तर महापालिकेला त्यांच्याशी संबंधित विभागांमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज पाहण्याची सोय असणार आहे़ याखेरीज सुसज्ज कॅमेरे असलेल्या तीन मोबाइल व्हॅनही असणार आहे़