नऊ कोटींच्या खरेदीला ‘ब्रेक’?

By Admin | Updated: November 19, 2015 23:58 IST2015-11-19T23:57:43+5:302015-11-19T23:58:15+5:30

जिल्हा बॅँक : आता २१ ऐवजी २६ला बैठक

9 crore purchase 'break'? | नऊ कोटींच्या खरेदीला ‘ब्रेक’?

नऊ कोटींच्या खरेदीला ‘ब्रेक’?

नाशिक : सातत्याने या ना त्या कारणाने वादाच्या भोवऱ्यात सापडलेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचा कारभार काही केल्या रुळावर येत नसून, सीसीटीव्ही खरेदीनंतर आता तिजोरी खरेदीच्या निमित्ताने वादळ उठण्याची चिन्हे आहेत.
मात्र जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती पाहूनच ही तिजोरी खरेदीची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे दीडशेहून अधिक तिजोरी खरेदी करण्याबाबत एका खासगी संस्थेकडून लेखापरीक्षण अहवाल आल्यानंतरही टप्प्याटप्प्यातच ही खरेदीप्रक्रिया राबविण्याकडे प्रशासनाचा कल आहे. येत्या शनिवारी (दि. २१) जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालक मंडळाची बैठक होती. त्या बैठकीत हा तिजोरी खरेदीचा विषय होता. मात्र त्याच दिवशी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलविली आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरची संचालक मंडळाची बैठक रद्द करण्यात येऊन आता ती २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
जिल्हा बॅँकेच्या ग्रामीण भागातील शाखांमध्ये वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने तोडगा म्हणून जिल्हा बॅँकेतील शिपायांनाच सुरक्षारक्षक म्हणून रात्रपाळीस नेमणूक दिली होती. तसेच वाहत्या गंगेत हात धूत सर्वच शाखांमध्ये सीसीटीव्ही खरेदी करीत ठरावीक ठेकेदाराला हे कंत्राट देऊन कोट्यवधी रुपयांची खरेदी केली होती. या खरेदीवरून जिल्हा बॅँकेचे संचालक मंडळ संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. काही संचालकांनी या खरेदीस सुरुवातीला विरोधही केला होता. नंतर अचानक या संचालकांचा विरोध मावळल्याने ही कोट्यावधी रुपयांची खरेदी करण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: 9 crore purchase 'break'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.