‘घुमान’साठी 850 नाशिककर
By Admin | Updated: March 3, 2015 00:39 IST2015-03-03T00:39:46+5:302015-03-03T00:39:58+5:30
साहित्य संमेलन : शहरातून रवाना होणाऱ्या रसिकांचा आकडा निश्चित

‘घुमान’साठी 850 नाशिककर
नाशिक : पुढच्या महिन्यात पंजाबमधील घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आठशे नाशिककर सहभागी होणार असल्याचे निश्चित झाले आहे. येथील बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने सुमारे पाचशे, खासगी ट्रॅव्हल कंपन्यांद्वारे साडेतीनशे आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने चौदा व्यक्ती साहित्य संमेलनाला रवाना होणार आहेत. येत्या चार मार्चपर्यंत नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे.
संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे होणाऱ्या साहित्य संमेलनात अधिकाधिक रसिकांनी सहभागी व्हावे, यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद तसेच घुमान येथील स्थानिक आयोजकांचा प्रयत्न सुरू आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी बारा बलुतेदार महासंघाकडे नाशिकच्या नोंदणीची सूत्रे दिली होती. त्यानुसार आतापर्यंत सुमारे चारशे रसिकांची नोंदणी झाली असून, येत्या ४ मार्चपर्यंत आणखी शंभर जणांची नोंदणी होणार आहे. तीन हजार रुपये असे संमेलनाचे शुल्क असून, त्यात दोन्ही बाजूंचा प्रवास, निवास व भोजन व्यवस्थेचा समावेश आहे.
पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनेही राज्यात ठिकठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू करण्यात आली. गेल्या महिन्यात नाशिकमधील ‘मसाप’ची शाखा कार्यान्वित झाली. या शाखेच्या वतीने कुसुमाग्रज स्मारक येथे नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. तेथील नोंदणीची मुदत २७ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली असून, तेथे अवघ्या चौदाच रसिकांनी नोंदणी केली आहे. एचपीटी महाविद्यालयाच्या वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन महाविद्यालयाचेही सुमारे ४० विद्यार्थी साहित्य संमेलनासाठी रवाना होणार आहेत. (प्रतिनिधी)