मनसेत ८५ टक्के नवखे उमेदवार
By Admin | Updated: February 5, 2017 23:25 IST2017-02-05T23:24:35+5:302017-02-05T23:25:14+5:30
सत्त्वपरीक्षा : विद्यमान नऊ नगरसेवक रिंगणात

मनसेत ८५ टक्के नवखे उमेदवार
नाशिक : गेल्या पाच वर्षांत महापालिकेत सत्ता उपभोगणाऱ्या मनसेने यंदा महापालिका निवडणुकीत घोषित केलेल्या उमेदवारांमध्ये सुमारे ८५ टक्के चेहरे हे नवखे आहेत. पाच वर्षांत ४० पैकी ३० नगरसेवक सोडून गेल्याने मनसेने शिल्लक १० पैकी ८ नगरसेवकांसह एका स्वीकृत नगरसेवकाला उमेदवारी बहाल केली आहे, तर दोन नगरसेवकांनी पुन्हा न लढण्याचे ठरविले आहे. नवख्या लोकांना सोबत घेऊन मनसेचे राज ठाकरे यांना महापालिका निवडणुकीला सामोरे जावे लागणार असून, पक्षाची सत्त्वपरीक्षा आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनसेने सर्वच्या सर्व १२२ उमेदवार दिले होते. त्यात ४० उमेदवार निवडून आले होते. मात्र, पाच वर्षांत पक्षाची वाताहत झाली आणि तब्बल ३० नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला. आता उरलेल्या दहा नगरसेवकांना सोबत घेऊन मनसेने पुन्हा एकदा महापालिकेवर पक्षाचा झेंडा फडकविण्याचे स्वप्न पाहिले आहे. पक्षाची पुरती वाताहत झाली असताना आणि पक्षाच्या एकूण अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह लटकले असताना यंदा तब्बल १०३ उमेदवारांची यादी मनसेने घोषित केली आहे. त्यात १५ टक्के अनुभवी व ओळखीचे चेहरे वगळता इतर सर्व उमेदवार हे नवखे आहेत. त्यातील अनेक जण पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रामुख्याने, पक्षाकडे तरुण उमेदवारांची फळी मोठी असल्याने राज ठाकरे यांच्याकडून प्रचारातही तोच मुद्दा पुढे केला जाण्याची शक्यता आहे. मनसेने पक्षात उरलेले महापौर अशोक मुर्तडक, स्थायी समिती सभापती सलीम शेख, सभागृहनेता सुरेखा भोसले, नगरसेवक सविता काळे, मेधा साळवे, कांचन पाटील, गटनेता अनिल मटाले, अर्चना जाधव यांच्यासह स्वीकृत नगरसेवक संदीप लेनकर यांना पुन्हा उमेदवारी बहाल केली आहे. याशिवाय, काही माजी नगरसेवकांनाही पक्षाने उमेदवारी बहाल केलेली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराची सारी धुरा मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर असणार असून, येत्या १७ फेबु्रवारीला राज ठाकरे यांच्या जाहीर सभेसाठी पक्षाने गोल्फ क्लब मैदान आरक्षित केले आहे. यंदा राज ठाकरे प्रचारात नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार
आहे. (प्रतिनिधी)