बार असोसिएशनच्या निवडणुकीत ८३.६ टक्के मतदान
By Admin | Updated: July 11, 2017 19:13 IST2017-07-11T18:23:09+5:302017-07-11T19:13:05+5:30
सकाळच्या सुमारास संथ तर दुपारनंतर पुरुष व महिला वकिलांनी मतदानासाठी भली मोठी रांग लावल्याने मतदानाचा वेग वाढला होता़

बार असोसिएशनच्या निवडणुकीत ८३.६ टक्के मतदान
नाशिक : प्रस्थापितांना विरोध व परिवर्तन या दोन मुद्द्यांवर लढविल्या गेलेल्या जिल्हा न्यायालयातील नाशिक बार असोसिएशन कार्यकारिणीच्या अकरा जागांसाठी मंगळवारी (दि़११) झालेल्या मतदानप्रक्रियेत ८३़६ टक्के मतदान झाले़ एकूण ३ हजार ४२ पैकी २ हजार ५४३ वकिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़ दुपारी भोजनाच्या सुटीनंतर जिल्हा न्यायालय तसेच तालुका न्यायालयातील मतदारांनी मोठी गर्दी केली होती़ दरम्यान, ५९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असून, बुधवारी (दि़१२) सकाळी मतमोजणीस सुरुवात होणार आहे़
जिल्हा न्यायालयाच्या नव्या इमारतीतील आयटी लायब्ररी व सरकारी अभियोक्ता कार्यालय या दोन ठिकाणच्या मतदान केंद्रांवर ३८ बूथ लावण्यात आले होते़ सकाळी आठऐवजी ८ वाजून ३५ मिनिटांनी प्रत्यक्ष मतदानप्रक्रि येस सुरुवात झाली़ त्यामुळे सायंकाळी चार वाजेऐवजी ४़३५ अशी मतदानाची वेळ वाढविण्यात आली होती़ सकाळच्या सुमारास संथ तर दुपारनंतर पुरुष व महिला वकिलांनी मतदानासाठी भली मोठी रांग लावल्याने मतदानाचा वेग वाढला होता़
दुपारनंतर जिल्ह्यातील मालेगाव, निफाड, येवला, नांदगाव, चांदवड, सटाणा, कळवण, मनमाड, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी यांसह तालुका न्यायालयांतील वकिलांनी मतदान केले. निवडणुकीत महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता. आयटी लायब्ररीत बुधवारी (दि़१२) सकाळी नऊपासून अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सहसचिव (महिला) या पदांसाठीची मतमोजणी होईल. त्यानंतर गुरुवारी (दि़१३) सकाळी नऊ वाजता खजिनदार, सदस्य, महिला सदस्य, सात वर्षांखालील वकील सदस्यपदाची मतमोजणी सुरू होईल़