प्रवेशापासून ८२७ आदिवासी विद्यार्थी वंचित
By Admin | Updated: September 12, 2016 00:36 IST2016-09-12T00:33:47+5:302016-09-12T00:36:43+5:30
इंग्रजी माध्यमाच्या शाळा : विद्यार्थ्यांचे नुकसान, अपर आयुक्तांच्या पत्रामुळे पालक संतप्त

प्रवेशापासून ८२७ आदिवासी विद्यार्थी वंचित
कळवण : इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेतील प्रवेशापासून कळवण, सुरगाणा, बागलाण, देवळा, मालेगाव, चांदवड व नांदगाव या सात तालुक्यांतील ८२७ आदिवासी विद्यार्थी वंचित राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात असताना, अपर आयुक्तांच्या पत्रामुळे आदिवासी पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ न देता अन्य नामांकित शाळेत या आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी शासनस्तरावरु न उपाययोजना करावी, अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत असलेल्या कळवण, सुरगाणा, सटाणा, मालेगाव, चांदवड, देवळा, नांदगाव या सात तालुक्यांतील आदिवासी मुलांना इयत्ता पहिली व पाचवीत इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची संधी आदिवासी विकास विभागाने उपलब्ध करून दिली आहे. आदिवासी विकास विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कळवण प्रकल्पातील ८२७ आदिवासी विद्यार्थी, विद्यार्थिनी आजही इंग्रजी माध्यम शाळेत प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. नामांकित इंग्रजी माध्यम शाळांचे शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल चार महिने झाले असून, अजूनही ८२७ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. नाशिक येथील अपर आयुक्त कार्यालयाकडून नुकतेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाला पत्र प्राप्त झाले आहे. यात त्यांनी नामांकित शाळेत प्रवेश देण्यास असमर्थता दर्शविल्याने आदिवासी विकास विभागाचे वेळकाढू धोरण अन् दुर्लक्षामुळे आदिवासी बांधवांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
नाशिक, कोकमठाण, पुरणगाव, विठेवाडी येथील नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत इयत्ता पहिली व पाचवीसाठी आदिवासी विकास विभागाने विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असून, शैक्षणिक सत्र सुरू होऊन तब्बल चार महिन्याचा कालावधी होत आला आहे. पहिल्या शैक्षणिक सत्रातील कामकाज सुरू झाले असून, या नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत ८२७ विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रवेश मिळणार असल्याच्या अपेक्षेने या विद्यार्थ्यांनी कुठल्याही अन्य शाळेत प्रवेश घेतला नाही. अशा शेकडो विद्यार्थ्यांच्या पालकांना आदिवासी विकास विभाग शासनाने प्रवेशप्रक्रि या बंद केल्याचे यंत्रणा सांगत असल्याने पालकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विभागाच्या यंत्रणेकडून आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांना योग्य सुचना व मार्गदर्शन न झाल्यामुळे व सापत्न वागणूक दिली गेल्याने ८२७ विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला प्रकल्प कार्यालयातील शिक्षण विस्तार अधिकारी महाजन यांनाच जबाबदार धरावे अशी भूमिका पालकांनी घेतली आहे. कळवण तालुका आदिवासी संघर्ष समितीचे अध्यक्ष डी. एम. गायकवाड,
भाईदास महाले, भीमराव
ठाकरे, मधुकर चौधरी, यशवंत गावित यांनी आंदोलनाचा इशारा दिला
आहे. (वार्ताहर)