शहरात ८० मिलिमीटर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2016 23:49 IST2016-07-03T23:29:18+5:302016-07-03T23:49:17+5:30
आशा पल्लवित : रविवारी सर्वाधिक पावसाची नोंद

शहरात ८० मिलिमीटर पाऊस
नाशिक : यावर्षी शहरात आतापर्यंत ८० मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद पेठरोडवरील हवामान खात्याने केली आहे. रविवारी शहरात पंधरा तासांमध्ये ४९.१ मिलिमीटर इतका या मोसमातील सर्वाधिक पाऊस नोंदविला
गेला.
शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाला शहरासह जिल्ह्यात सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर पहाटे पावसाने विश्रांती घेतली; मात्र सकाळी पुन्हा जोर धरला आणि रात्रीपर्यंत पाऊस शहरासह उपनगरांमध्ये तसेच जिल्ह्यात टिकून होता. त्यामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत शहरात आजपर्यंतची सर्वाधिक ४९.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जूनअखेर शहरात ११.३ मि.मी पावसाची नोंद के ली गेली, तर जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी शहरात १.२ मि.मी पाऊस झाला होता. रविवारी संध्याकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला. साडेपाच ते साडेआठ वाजेपर्यंत ६.४ मि.मी इतका पाऊस पडल्याचे हवामान खात्याने सांगितले.
जूनमध्ये पावसाने नाशिककरांची निराशा जरी केली असली तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार ‘एन्ट्री’ केल्याने या महिन्यात नाशिककरांना मनमुरादपणे पावसाचा आनंद लुटता येण्याची शक्यता आहे. वरुणराजाची कृपादृष्टी अशीच राहिल्यास गोदावरी दुथडी भरून वाहण्यास वेळ लागणार नाही, अशी चर्चा दिवसभर शहरातील विविध चहाच्या टपऱ्या तसेच रिमझिम पाऊसधारा अंगावर झेलत पाववडा, समोसा खात नागरिकांकडून केली जात होती. जुलै महिन्याच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या या संततधार पावसाने नाशिककरांच्या आशा अधिक पल्लवित झाल्या आहेत.
शहरासह जिल्ह्यात दमदार पावसाला सुरुवात व्हावी, यासाठी नागरिकांनी आपापल्या परीने परमेश्वराला वेगवेगळ्या उपासना पद्धतींमधून साकडे घातले होते. गोदाकाठावरील बाणेश्वर महादेव मंदिरातील पिंडही पाण्यात बुडविण्यात आली होती. एकूणच सर्वच नाशिककर मनापासून पर्जन्यवृष्टीसाठी प्रार्थना करत होते. (प्रतिनिधी)