32 विविध पदांसाठी 760 उमेदवारांची ‘परीक्षा’
By Admin | Updated: November 25, 2015 23:32 IST2015-11-25T23:31:17+5:302015-11-25T23:32:02+5:30
जिल्हा परिषद नोकर भरती

32 विविध पदांसाठी 760 उमेदवारांची ‘परीक्षा’
नाशिक : जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीचा हंगाम सुरू झाला असून बुधवारी (दि. २५) झालेल्या विविध पदांसाठीच्या लेखी परीक्षेसाठी तब्बल ७६० उमेदवारांनी परीक्षा दिली. येत्या शनिवारी पुन्हा दोन पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेत वेगवेगळ्या संवर्गाची ७२ पदे भरण्यात येणार असून त्यासाठी कालपासून लेखी परीक्षा सुरू झाल्या. बुधवारी शहरातील भोसला हायस्कूल, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, रचना विद्यालय व न्यू पुरुषोत्तम हायस्कूल या चार परीक्षा केंद्रांवर जिल्हा परिषदेचे १०० हून अधिक कर्मचारी व अधिकारी लेखी परीक्षेसाठी पर्यवेक्षक व सहकारी म्हणून हजर होते.
बुधवारी सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत पहिल्या सत्रात वरिष्ठ सहायक पदाच्या एका जागेसाठी १३० उमेदवारांनी अर्ज केले होते. प्रत्यक्षात ९९ उमेदवार लेखी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले. दुपारी दोन ते साडेतीनच्या सत्रात आरोग्यसेविका व अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यात आरोग्यसेविकेच्या २७ पदांसाठी ६२७ उमेदवारांनी अर्ज भरले होते. प्रत्यक्षात परीक्षेसाठी ४९५ उमेदवार प्रविष्ट झाले. तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका या संवर्गाच्या ४ पदांसाठी २०० उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यातील १६६ उमेदवार परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी दिली.
येत्या शनिवारी कनिष्ठ सहायक व कनिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार असून कनिष्ठ अभियंत्यांच्या ३ जागांसाठी ९४ तर कनिष्ठ स्थापत्य अभियांत्रिकच्या एका जागेसाठी १०९ उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. (प्रतिनिधी)