शहरात क्षयरोगाचे ७० रुग्ण
By Admin | Updated: April 25, 2016 00:27 IST2016-04-24T23:57:43+5:302016-04-25T00:27:00+5:30
अत्याधुनिक यंत्रणा : १८ रुग्ण एमडीआर क्षयरुग्ण

शहरात क्षयरोगाचे ७० रुग्ण
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात क्षयरोगाचे निदान होण्याची अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांत ७० रुग्ण क्षयाने बाधित झाल्याचे आढळून आले आहे, तर १८ रुग्णांना एमडीआर क्षयरोग झाल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरू करण्यात आल्याची माहिती क्षयरोग विभागाचे डॉ. गणेश्वर यांनी दिली.
सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने नाशिक जिल्ह्यातील रुग्णांसाठी सुमारे ४० लाख रुपये किमतीची जीन एक्सपर्ट मशीन नाशिक महापालिकेला उपलब्ध करून दिली आहे. क्षयरोगाच्या निदानासाठी थुंकीचे नमुने मुंबई अथवा पुणे येथे पाठविल्यानंतर त्याचा अहवाल येण्यास सुमारे २० ते ४५ दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, या मशिनरीमुळे अवघ्या दोन तासांत क्षयरोगाचे निदान होण्याची सुविधा नाशिकमध्येच उपलब्ध झाली आहे.
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात केंद्र सरकारच्या निधीतून ही अत्याधुनिक मशिनरी बसविण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना अगदी मोफत सदर सुविधा उपलब्ध झाली आहे. १३ फेबु्रवारी २०१६ रोजी सदर मशिनरीचे लोकार्पण महापौरांच्या हस्ते झाल्यानंतर दोन महिन्यांत १३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली असता ७० रुग्ण हे क्षयाने बाधित झाल्याचे निदर्शनास आले, तर त्यातील १८ रुग्णांना एमडीआर क्षयरोग झाल्याचेही निष्पन्न झाले. एमडीआर क्षयरोग हा नेहमीच्या औषधोपचारांना दाद न देणारा आजार असून, त्यासाठी वेगळ्या प्रकारचे औषधोपचार आहेत. या उपचारासाठी सुमारे अडीच वर्षांचा कालावधी जावा लागतो. (प्रतिनिधी)