७० कोटी घरपट्टी वसुली
By Admin | Updated: February 24, 2016 00:04 IST2016-02-23T23:53:45+5:302016-02-24T00:04:28+5:30
महापालिका : आणखी २० कोटींचे उद्दिष्ट

७० कोटी घरपट्टी वसुली
नाशिक : मार्चअखेर महापालिकेने घरपट्टी वसुलीतून १२५ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले असले तरी महिनाभरात ९० कोटी रुपयांचा आकडा पार करण्याचा दावा घरपट्टी विभागाचे उपआयुक्त रोहिदास दोरकुळकर यांनी केला आहे. दरम्यान, थकबाकीदार मिळकतधारकांविरुद्ध सुरू असलेली वसुली मोहीम आणखी व्यापक करण्यात येणार असल्याचे दोरकुळकर यांनी सांगितले.
महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मागील वर्षी आपले पहिले अंदाजपत्रक सादर करताना घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट १२५ कोटी रुपयांचे ठेवले होते. त्यासाठी अंदाजपत्रकात घरपट्टीत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली होती, तर नव्याने होणाऱ्या वसाहतीत रेडीरेकनरनुसार घरपट्टी आकारणीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, स्थायी समिती व महासभेने घरपट्टी वाढीचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे आयुक्तांनी घरपट्टीचे उत्पन्नवाढीसाठी मागील वर्षी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत घरपट्टी भरणाऱ्या मिळकतधारकांना २ ते ५ टक्क्यांपर्यंत सवलत योजना लागू केली होती. या योजनेला मिळकतधारकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पहिल्या तीन महिन्यांतच घरपट्टीची वसुली सुमारे ३६ कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचली होती. नंतर मात्र घरपट्टी वसुलीचा वेग मंदावला होता. आता २३ फेबु्रवारी अखेर महापालिकेने ७० कोटी रुपये घरपट्टीची वसुली केली असून, त्यात सातपूर विभाग- ७ कोटी ७५ लाख, पश्चिम- १२ कोटी ९४ लाख, पूर्व- १२ कोटी ६८ लाख, पंचवटी- १० कोटी ९२ लाख, सिडको- १३ कोटी ६४ लाख आणि नाशिकरोड १२ कोटी १० लाख रुपये वसुली करण्यात यश आले आहे. मार्चअखेरपर्यंत ९० कोटींच्या वर वसुली जाईल, असा विश्वास रोहिदास दोरकुळकर यांनी व्यक्त केला आहे.