कसबा सांगावमधील सात कुटुंबे वाळीत

By Admin | Updated: June 10, 2015 00:46 IST2015-06-10T00:41:59+5:302015-06-10T00:46:37+5:30

मेंढे धनगर समाज : जातपंचायतीचा मानसिक त्रास

7 families in Kasba Sayk | कसबा सांगावमधील सात कुटुंबे वाळीत

कसबा सांगावमधील सात कुटुंबे वाळीत

कोल्हापूर/कागल : कसबा सांगाव (ता. कागल) येथील मेंढे धनगर समाजातील सात कुटुंबांना त्याच समाजाने वाळीत टाकले आहे. जातपंचायतीच्या जाचक अटींमुळे ही कुटुंबे मेटाकुटीला आली असून, या जाचाविरुद्ध बंड करायचे त्यांनी ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी सोमवारी कागलच्या तहसीलदारांची मुलाबाळांसह भेट घेऊन जातपंचायतीला पायबंद घालण्याची मागणी केली.
तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना या कुटुंबीयांच्यावतीने निवेदन देण्यात आले. त्यावर शंकर नारायण पुजारी, मारुती नारायण पुजारी, धनपाल आप्पाजी पुजारी, रामचंद्र नारायण पुजारी, साऊबाई रामचंद्र पुजारी, अनिल पुजारी, श्रीपती पुजारी, आदींसह १७ नागरिकांच्या सह्णा आहेत. आपल्याच समाजातील देवाप्पा बाबूराव नायकवडे, मधुकर कोण्णे, बाळू कोण्णे, निगाप्पा बटू पुजारी, बाबासो देवाप्पा नायकवडे, महादेव दौलू हजारे, विठ्ठल रामू हजारे, बाळू किसन हजारे हे लोक जातपंचायतीच्या नावाखाली आमचा छळ करत असल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात काही लोकांकडून जातपंचायतीच्या नावावर स्त्रिया आणि पुरुषांना नाहक त्रास दिला जात आहे. ही सात कुटुंबे २००७ पासून या गोष्टींचा त्रास सहन करत आहेत. परंतु, अलीकडच्या काळात या त्रासात वाढ झाली आहे. जातपंचायतीविरोधात महाराष्ट्रभर आवाज उठविला जात आहे. अनेक ठिकाणी अशा निष्ठूर लोकांना शिक्षाही झाली आहे. तरीही कसबा सांगावमध्ये आजही अशी वागणूक मिळते. तेव्हा संबंधितांवर कारवाई करण्यात यावी; अन्यथा आम्हाला माणूस म्हणून जगणेही अवघड होईल. आम्ही जातपंचायतीच्या विरोधात आवाज उठविल्याने या लोकांकडून आम्हाला त्रास अथवा जीविताला धोकाही होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने त्यांना वेळीच पायबंद घालावा.


जेवण्याच्या पंगतीतून उठविले जाते तेव्हा...
आमच्या कुटुंबातील व्यक्तींना मंदिरातील प्रवेश बंदी, पै-पाहुण्यांच्या विविध समारंभास जायला निर्बंध, बोलणे बंद करणे, एक हजारपासून दहा हजारांपर्यंत विनापावती दंड आकारणी, इतर लोकांशी बोलू नये अशी व्यवस्था करणे, लहानांपासून वयोवृद्ध लोकांना जेवताना पंगतीतून उठवून अपमान करणे, मंदिरात पूजा करताना मज्जाव करणे व केलेली पूजा मोडीत काढणे, यासारख्या घटना घडत आहेत. त्याचा आम्हा सर्वांना नाहक मानसिक त्रास होत आहे, असे या लोकांचे म्हणणे आहे.

बहिष्काराच्या घटनेचा इन्कार
या सात कुटुंबीयांनी केलेल्या या आरोपाबद्दल ‘लोकमत’ने समाजातील देवाप्पा नायकवडे आणि विठ्ठल हजारे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, असा कोणता बहिष्कार समाजाने टाकलेला नाही.
कारण या सात कुटुंबीयांत आमचे नातलगही आहेत. समाज एकत्र राहावा हीच आमची भूमिका आहे. मंदिर प्रवेश बंद, विनापावती दंड आकारणी हे आरोप खोटे आहेत.
बघू...करू...
जास्त त्रास होत असल्याने प्रशासनाने त्यामध्ये लक्ष घालावे, म्हणून मुलाबाळांसह तहसीलदार शांताराम सांगडे यांची भेट घेतली. परंतु, त्यांनी बघू...करू... अशा स्वरूपाचे आश्वासन दिले. असले झगडे कधी लगेच मिटतात का? अशीही विचारणा त्यांनी केली.
जे लोक जातपंचायतीच्या नावाखाली त्रास देतात, त्यांना राजकीय वरदहस्त असल्याची तक्रार या सात कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: 7 families in Kasba Sayk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.