जिल्ह्यात ६८ टक्के !
By Admin | Updated: February 21, 2017 23:40 IST2017-02-21T23:39:41+5:302017-02-21T23:40:12+5:30
मतदान शांततेत : सर्वाधिक पेठ, तर सर्वात कमी नाशिकमध्ये

जिल्ह्यात ६८ टक्के !
नाशिक : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जिल्ह्यात सुमारे ६८ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पेठ तालुक्यात ७६ टक्के झाले, तर सर्वात कमी मतदान नाशिक तालुक्यात ४२.०६ टक्के झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता जिल्ह्यात मतदान शांततेत पार पडले. सकाळी मतदारांमध्ये काहीसा निरुत्साह होता. मात्र दुपारनंतर अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. दिंडोरी तालुक्यातील वणीनजीक भातोडे गावात इव्हीएम यंत्रात तांत्रिक अडचणीने अनेकांना खोळंबून राहावे लागले. असाच प्रकार कळवण, त्र्यंबकेश्वर येथे घडल्याने मतदारांमध्ये संताप व्यक्त होत होता. निफाड तालुक्यातील ओझर येथेही मतदार याद्यांमधील घोळामुळे अनेक मतदार मतदान न करताच निघून गेले. मालेगाव तालुक्यात किरकोळ वादाचे प्रकार घडले. या तालुक्यातही दुपार सत्रानंतरच मतदारांनी घराबाहेर पडणे पसंत केल्याने शेवटच्या टप्प्यात मतदानासाठी गर्दी झाली होती.
देवळा तालुक्यातील खामखेडा येथील मतदान केंद्रांवर लांबलचक रांग लागल्यामुळे चक्कर आल्याने एका महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.कसबे सुकेणे आणि मौजे सुकेणे येथील मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. द्राक्ष हंगाम सुरू असल्याने या भागातील मतदान केंद्रांवर सकाळी मतदानासाठी मतदारांनी गर्दी केली होती. कसबे सुकेणे गट हा जिल्हा परिषदेसाठी आरक्षित असल्याने प्रचाराच्या सुरुवातीला काहीसा निरुत्साह असला तरी मात्र शेवटच्या टप्प्यात निर्माण झालेल्या चुरशीमुळे प्रत्येक पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठेची बनवली. त्यामुळे त्याभागातील मतदानाच्या टक्केवारीवर त्याचा परिणाम झाला आणि उत्साह वाढला. कसबे सुकेणे गटातील सर्व गावे ही द्राक्ष उत्पादक असल्याने या भागात द्राक्ष खुडही सुरू आहे. त्यामुळे मजूरवर्गाने मतदान करून कामावर जाणे पसंत केले म्हणून कसबे सुकेणे गटातील कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, साकोरे मिग, कोकणगाव, वडाळी, दीक्षी या भागात मतदानकेंद्रावर सकाळपासून गर्दी होती.
(लोकमत ब्युरो)