६६ नगरसेवकांचा पहिल्यांदाच प्रवेश
By Admin | Updated: February 26, 2017 00:13 IST2017-02-26T00:13:33+5:302017-02-26T00:13:50+5:30
तरुणांना संधी : ३८ विद्यमान, तर १८ माजी नगरसेवक

६६ नगरसेवकांचा पहिल्यांदाच प्रवेश
नाशिक : महापालिका निवडणुकीत यंदा १२२ पैकी निवडून आलेले ६६ नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात पाऊल ठेवणार आहेत. त्यात बव्हंशी तरुणांना संधी लाभली असून, ३८ विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा निवडून आले आहेत. १८ माजी नगरसेवकही महापालिकेत परतले आहेत. महापालिका निवडणुकीत १२२ जागांसाठी ८२१ उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत तब्बल २२ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षांनी तरुण चेहऱ्यांना संधी दिली होती. बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे एका प्रभागातून चार सदस्य निवडून द्यायचे होते. त्यानुसार, राजकीय पक्षांकडून चार जागांवर उमेदवार देताना जुन्या-नव्यांचाही मेळ घालण्यात आला. त्यामुळे एकामुळे अन्य तिघांनाही फायदा झाला. यंदा १२२ पैकी तब्बल पन्नास टक्क्यांहून अधिक म्हणजे ६६ नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करत आहेत. त्यातही तरुण पिढीची सर्वांत जास्त संख्या आहे. अनेक तरुण चेहरे उच्चशिक्षित असल्याने महापालिकेच्या कामकाजात त्यांच्या शिक्षणाचा लाभ होईल. पहिल्यांदाच पाऊल ठेवणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने, भाजपाचे विद्यमान आमदार व शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे सुपुत्र मच्छिंद्र सानप, आमदार सीमा हिरे यांचे दीर योगेश हिरे, भाजपा आमदार राहुल अहेर यांच्या चुलत भगिनी हिमगौरी आडके, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक उत्तमराव कांबळे यांचे सुपुत्र समीर कांबळे, माजी आमदार वसंत गिते यांचे सुपुत्र प्रथमेश गिते, माजी महापौर अशोक दिवे यांचे सुपुत्र प्रशांत दिवे, माजी सनदी अधिकारी चंद्रकांत खाडे आदिंचा समावेश आहे. निवडणुकीत ३८ विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. त्यात काही नगरसेवक पाचव्यांदा, तर काही चौथ्यांदा महापालिकेत प्रवेश करत आहेत. यंदा १८ माजी नगरसेवकांचे पुन्हा एकदा नशीब खुलले आहे. त्यात काही नगरसेवकांनी यापूर्वी महापालिकेत हॅट््ट्रिक साधलेली आहे. (प्रतिनिधी)