जैन कॉन्फरन्ससाठी नाशकात ६४ टक्के मतदान

By Admin | Updated: May 22, 2016 23:47 IST2016-05-22T23:44:48+5:302016-05-22T23:47:09+5:30

मतदान शांततेत : पोलीस बंदोबस्तात मतमोजणीस सुरुवात

64 percent voting in Nashik district for Jain conference | जैन कॉन्फरन्ससाठी नाशकात ६४ टक्के मतदान

जैन कॉन्फरन्ससाठी नाशकात ६४ टक्के मतदान

नाशिक : जैन समाजाची शिखर संस्था आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सच्या देशपातळीवरील द्वैवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि़ २२) श्री पृथ्वीराजशेठ निमाणी मंगल कार्यालयात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले़ यामध्ये २६ जागांसाठी चतुर्थ प्रांतातील नाशिक केंद्रावर तीन हजार ५२० अर्थात ६४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला़ यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला़ रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती.
रविवार पेठतील निमाणी मंगल कार्यालयात सकाळी नऊ वाजता मतदानास सुरुवात झाली़ सायंकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली़ नाशिक सेंटरमधील (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, बुलढाणा, गडचिरोली, हिंगोली) येथील पाच हजार ५०० मतदारांपैकी तीन हजार ५२० अर्थात ६४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़, तर अहमदनगर सेंटरमधील (अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा, सांगली, सातारा, कोल्हापूर) आठ हजार ८४ मतदार होते़ या दोन्ही ठिकाणच्या मतदारांची एकूण संख्या १३ हजार ५८४ इतकी आहे़
जैन कॉन्फरन्सचे पाच झोन असून त्यामध्ये उत्तर भारत, दक्षिण भारत, मध्य प्रदेश व राजस्थान, मुंबई, ठाणे पुणे जिल्हा व गुजरात राज्य तसेच उर्वरित महाराष्ट्र (मुंबई, पुणे, ठाणे जिल्हा वगळून) यांचा समावेश होतो़ राष्ट्रीय पातळीवरच्या या निवडणुकीत राष्ट्रीय अध्यक्षपदाबरोबरच संपूर्ण देशातील पाच झोनमधून १३ प्रांत अध्यक्ष व ११० राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य निवडले जाणार आहेत़ यामध्ये चतुर्थ प्रांतासाठी एक प्रांत अध्यक्ष व २४ राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य निवडले जाणार आहेत़
राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी दोन, प्रांत अध्यक्षपदासाठी दोन, तर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्यपदाच्या २४ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत़ निमाणी मंगल कार्यालयात पार पडलेल्या मतदानासाठी एकूण ३० टेबल लावण्यात आले होते़ मतदान प्रक्रियेनंतर प्रांतीय निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड़ जवरीलाल घिया व सहअधिकारी अ‍ॅड़ अभय बोरा यांच्या अध्यक्षतेखाली ४० कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी सुरुवात करण्यात आली़ यावेळी मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून आला़ (प्रतिनिधी)

Web Title: 64 percent voting in Nashik district for Jain conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.