वर्षभरात ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण

By Admin | Updated: March 30, 2017 23:10 IST2017-03-30T23:10:38+5:302017-03-30T23:10:54+5:30

नाशिक : श्वान निर्बीजीकरणाच्या मोहिमेत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण झाले आहे

6235 Shuttle Disinvestment in the year | वर्षभरात ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण

वर्षभरात ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण

नाशिक : शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी महापालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या श्वान निर्बीजीकरणाच्या मोहिमेत एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण झाले आहे. दरम्यान, महापालिकेने पुढील आर्थिक वर्षासाठी नव्याने निविदा काढत नवीन ठेकेदार नेमला असून, त्यामार्फत मंगळवारी (दि.२८) श्वान निर्बीजीकरणाची मोहीम सुरू होणार आहे.
महापालिकेने श्वान निर्बीजीकरणासाठी विल्होळी जकात नाका येथे केंद्र उभारले असून, त्याठिकाणी पकडून आणलेल्या श्वानांवर शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी ठेकेदाराला प्रतिश्वान ७५० रुपये अदा केले जात होते. महापालिकेने सन २०१५ - १६ या वर्षाकरिता श्वान निर्बीजीकरणासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली होती.
सन २०१५ मध्ये महापालिकेने ४३४६ श्वानांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली आहे. त्यात नर श्वानांची संख्या १४९१, तर मादींची संख्या २८५५ इतकी होती. महापालिकेकडे श्वान पकडण्यासाठी दोन डॉग व्हॅन असून, १२ कर्मचाऱ्यांमार्फत सदर मोहीम राबविली जाते. सन २०१५ मध्ये महापालिकेने ३२ लाख ५९ हजार ५०० रुपये खर्च केले होते. महापालिकेने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत ६२३५ श्वानांचे निर्बीजीकरण केले आहे. गेल्या सहा-सात महिन्यांपासून महापालिकेकडून नव्याने निविदाप्रक्रिया राबविली जात होती. परंतु, अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे जुन्याच ठेकेदाराकडून काम सुरू होते.
महापालिकेने अगोदर सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी एक कोटी १४ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार केला होता, परंतु वाजवीपेक्षा जास्त रक्कम वाढविल्याने महासभेत त्याला विरोध झाला होता. अखेर आरोग्य विभागाने ९० लाख रुपयांचा ठेका देण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविली. त्यात हैदराबाद येथील नवोदय सोसायटीला ठेका देण्यात आला असून, दोन डॉग व्हॅनमार्फत मंगळवार (दि.२८) पासून मोहीम सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: 6235 Shuttle Disinvestment in the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.