महापालिकेच्या खजिन्यात ६१ कोटी रुपये अनुदान जमा
By Admin | Updated: November 11, 2015 23:27 IST2015-11-11T23:26:48+5:302015-11-11T23:27:20+5:30
पालिकेची दिवाळी : एलबीटीपोटी रक्कम

महापालिकेच्या खजिन्यात ६१ कोटी रुपये अनुदान जमा
नाशिक : एलबीटी रद्द झाल्याने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या नाशिक महापालिकेला नोव्हेंबर महिन्याचे ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे शासन अनुदान प्राप्त झाले असून, मुद्रांक शुल्काच्या एक टक्का अधिभाराच्या माध्यमातूनही १५ कोटी रुपये मिळाल्याने पालिकेच्या खजिन्यात ६१ कोटी रुपये जमा झाले आहेत. शासन अनुदानात कपात होण्याची भीती व्यक्त होत असतानाच शासनाने दिवाळीत भरघोस दान टाकल्याने पालिका प्रशासनाला मोठा दिलासा लाभला आहे.
महाराष्ट्र शासनाने १ आॅगस्ट २०१५ पासून ५० कोटी रुपयांच्या आतील उलाढालीवर एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेला दरमहा ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार शासनाने आॅगस्ट ते आॅक्टोबर या तीन महिन्यांचे अनुदान ३७ दिवसांतच देण्याची तत्परता दाखविली होती. त्यातून महापालिकेला १३७ कोटी रुपये प्राप्त झाले होते. दरम्यान, नोव्हेंबर महिन्याचे अनुदान रखडले होते. गेल्या सव्वा महिन्यापासून या अनुदानाची प्रतीक्षा होती. त्यातच, महापालिकेने ५० कोटी रुपयांच्या वरील उलाढालीवर सुमारे ३४ कोटी रुपयांचे उत्पन्न वसूल केल्याने शासनाकडून अनुदानात कपात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. शासनाने महापालिकेकडे त्यासंबंधी एकूण उत्पन्नाची आकडेवारीही मागितल्याने कपातीची शक्यता वाढली होती. शासनाकडून सुमारे १८ ते २० कोटी रुपयेच अनुदान मिळण्याची चर्चा होत असतानाच शासनाने मागील तारीख टाकत १४ आॅक्टोबरच्या निर्णयान्वये ४५ कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान महापालिकेला वितरित केले आहे. दरम्यान, आठवडाभरापूर्वीच शासनाने मुद्रांक शुल्काच्या एक टक्का अधिभारापोटी महापालिकेला १५ कोटी २३ लाख रुपये वितरित केले आहेत. त्यामुळे महापालिकेला नोव्हेंबर महिन्यात ६१ कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाल्याने दिवाळीचा आनंद द्विगुणीत झाला आहे. (प्रतिनिधी)