२५ दिवसांत ६० टक्के पाणीसाठा
By Admin | Updated: July 27, 2016 00:10 IST2016-07-27T00:10:03+5:302016-07-27T00:10:36+5:30
छप्पर फाडके : गंगापूर-दारणा धरण ७५ टक्के भरले

२५ दिवसांत ६० टक्के पाणीसाठा
नाशिक : जून महिना कोरडा गेल्यानंतर नाशिककरांच्या चिंता वाढल्या असतानाच वरुणराजाची कृपावृष्टी झाली आणि २५ दिवसांत गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात तब्बल ६० टक्के पाणीसाठा जमा झाला. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर आणि दारणा धरण ७५ टक्के भरले असून, दारणातून १५३० क्यूसेक पाण्याचा विसर्गही करण्यात आला आहे. दरम्यान, महापालिकेने दर गुरुवारी होणारी पाणीकपात रद्द केल्याने पाणीपुरवठ्याविषयी येणाऱ्या तक्रारींतही घट झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाच्या सूत्रांनी दिली.
जून महिना संपूर्ण कोरडा गेलेला आणि गंगापूर धरणातील पाणीसाठा अवघा १५ टक्क्यांपर्यंत येऊन ठेपला असताना नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याविषयी चिंता वाढल्या होत्या. महापालिकेकडूनही आणखी पाणीकपातीचे संकेत दिले जात होते. दारणातील अतिरिक्त आरक्षण गंगापूरमध्ये वळविण्याबाबतही महापालिकेने जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला होता. दि. २ जुलै रोजी गंगापूर धरणात ९१७ दलघफू (१५ टक्के), तर दारणात ३४० दलघफू पाणीसाठा शिल्लक होता.